शाळा फक्त ‘ती’च्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:36 PM2017-10-30T22:36:15+5:302017-10-30T22:36:25+5:30

तनुला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते!

School only for 'TI' | शाळा फक्त ‘ती’च्यासाठी

शाळा फक्त ‘ती’च्यासाठी

Next
ठळक मुद्देजिल्हा परिषद चालविते एका मुलीसाठी शाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : तनुला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते. असं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते!
वर्ध्यांच्या कोपरा गावातली प्राथमिक जिल्हा परिषदेची ही शाळा. ‘त्या’ शाळेची विद्यार्थी संख्या केवळ एक आहे. मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी सुरू केली. मुलगी शिकली आणि आर्थिकदृष्टया सक्षम झाली तर आईवडिलांना मुलींच्या भवितव्याची चिंता करण्याची गरज राहणार नाही. शिवाय मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोणही बदलेल. शासनाचा हाच उद्देश ही शाळा पूर्ण करण्याचा ध्यास ठेवते.
तिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते तेव्हा शाळा रोज रिकामीच असते. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या या शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. गतवर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षात फक्त तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली. एकच विद्यार्थिनी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती.
शाळा बंद पडली तर तनूचं शिक्षण बंद होईल. तिला कदाचित आईसोबत शेतमजुरीलाही जाव लागेल. म्हणूनच वर्धा जिल्हा परिषदेनं या एका विद्यार्थिनीसाठी दरमाही ६० ते ७० हजार रुपये खर्च करून ही शाळा सुरू ठेवली आहे. शाळेची इमारत धोकादायक झाल्यानं तनूची शाळा शेजारील किचनशेडमध्ये भरते.
या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी अरुण सातपुते हे शिक्षक रोज शाळेत येतात. तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात. शाळेत वीजही नसते. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही शाळा सुरू आहेच.
याबाबत गटशिक्षणाधिकारी बारसागडे यांनी सांगितले की ‘एखाद्या गावात कमी विद्यार्थी संख्या असली तर आम्ही त्यांना शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या अन्य शाळेत वर्ग करतो. मात्र या गावापासून तीन किलोमीटपर्यंत कोणतीही शाळा नाही. तसेच शाळेत येण्यासाठी रस्ते चांगले नाहीत. या गावात जेमतेम १४ घरे आहेत. त्यामुळे दखलपात्र विद्यार्थ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे तनुसाठी ही शाळा सुरू ठेवणे क्रमप्राप्त होते. कोपरा गावातील जिल्हा परिषदेची ही शाळा पाचवीपर्यंत आहे. कोपरा गावाचं पुनर्वसन झाल्याने नागरिक दुसºया गावी स्थलांतरिक झाले आहेत. सध्या या गावाची लोकसंख्या फक्त ६४ आहे. त्यामुळे मुलांची संख्या वाढेल. याची चिन्ह काही दिसत नाहीत. त्यामुळे कदाचित पाचवीपर्यंत तनुला या शाळेत एकटीच जावं लागेल. असं सध्यातरी चित्र दिसत आहे.

तनूला व्हायचं आहे डॉक्टर
शाळेची परिस्थिती प्रतिकूल असली तरी तनू मात्र आनंदी आहे. तनूशी गप्पा मारल्यावर तिने तिला डॉक्टर व्हायचे आहे, असे सांगितले.

धोकादायक इमारत असल्यास तिथे विद्यार्थ्यांना बसवू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. कोपरा गावातील प्राथमिक शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने शाळेची नवीन इमारत उभी राहू शकत नाही. परंतु तनूची गैरसोय होऊ नये म्हणून शाळेशेजारील किचन शेडमध्ये तिच्या शिक्षणाची सोय केली आहे.
- ललितकुमार बारसागडे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती हिंगणघाट.

Web Title: School only for 'TI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.