प्रवेश देण्यास शाळेचा नकार
By admin | Published: May 8, 2017 12:43 AM2017-05-08T00:43:15+5:302017-05-08T00:43:15+5:30
इयत्ता चौथीमध्ये ए प्लस श्रेणी असूनही मुलीला सुशिल हिंमतसिंगका विद्यालयात प्रवेश नाकारला जात असल्याने पालक संतप्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इयत्ता चौथीमध्ये ए प्लस श्रेणी असूनही मुलीला सुशिल हिंमतसिंगका विद्यालयात प्रवेश नाकारला जात असल्याने पालक संतप्त आहे. संस्थेच्या दुसऱ्या शाळेलाही विद्यार्थी मिळावे म्हणून हे धोरण आखल्याचा आरोप पालक अतूल उमाठे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक यांना तक्रार केली आहे.
सायली उमाठे ही महिलाश्रम बुनियादी प्राथमिक विद्यालय (शहर विभाग) या शाळेची विद्यार्थिनी आहे. सत्र २०१६-१७ मध्ये इयत्ता चौथीमध्ये ती ए प्लस श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली. तिला इयत्ता पाचवीमध्ये सुशिल हिंमतसिंगका विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून उमाठे यांनी प्रयत्न केले; पण तेथे त्यांना उद्धट वागणूक देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. कुठलेही कारण न देता शाळेत प्रवेश मिळणार नाही, असे सांगून प्रवेश नाकारला. प्रवेश नाकारण्याचे कारण अद्यापही सांगण्यात आलेले नाही. या प्रकारामुळे ते संतप्त आहेत. त्यांनी सुशिल हिंमतसिंगका विद्यालयात इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश घेण्याच्या कालावधीची सूचना फलकावर का लावण्यात आली नाही. इयत्ता पाचवीमध्ये प्रवेशासाठी कोणते निकष लावण्यात आले. पाल्यांचे प्रवेश नाकारण्याचे कारण काय. २ मे पर्यंत विद्यार्थ्यांना कोणत्या निकषावर प्रवेश दिले. त्यांच्या नावासह मिळालेल्या गुणांची श्रेणी काय, आदी प्रश्न उमाठे यांनी उपस्थित केले आहेत.
शाळेतील सूचना फलकावर महिला आश्रम बुनियादी प्राथमिक मराठी विद्यालय शहर परिसर मगनसंग्रहायल येथील विद्यार्थ्यांना सुशिल हिंमतसिंगका विद्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. त्या विद्यार्थ्यांनी रत्नीबाई विद्यालयात प्रवेश घ्यावा, अशी सूचना लावली आहे. ही सूचना शिक्षण विभागाच्या कोणत्या नियमानुसार लावली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.