शाळकरी विद्यार्थ्याने साकारला कुलर दुरूस्तीचा व्यवसाय

By Admin | Published: April 6, 2017 12:18 AM2017-04-06T00:18:20+5:302017-04-06T00:18:20+5:30

शालेय शिक्षण घेतानाच पालकाच्या व्यवसायात मदत करणाऱ्या नववीतील एका मुलाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला.

School Student's Successful Kular Correctional Business | शाळकरी विद्यार्थ्याने साकारला कुलर दुरूस्तीचा व्यवसाय

शाळकरी विद्यार्थ्याने साकारला कुलर दुरूस्तीचा व्यवसाय

googlenewsNext

अर्निंग आणि लर्निंग : नववीतील विद्यार्थ्यांनी घेतले प्रशिक्षण
सेलू : शालेय शिक्षण घेतानाच पालकाच्या व्यवसायात मदत करणाऱ्या नववीतील एका मुलाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. कुलर दुरूस्तीचे प्रशिक्षण घेऊन त्याने त्याचा मित्रालाही या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याची किमया रेहकी येथील सागर लाडे या १४ वर्षीय बालकाने साधली. विद्यार्थी दशेत अभ्यासासह टिव्ही, व्हीडीओ गेम, मोबाइलच्या गर्तेत बुडालेल्या विद्यार्थ्यांसाठी सागर प्रेरणादायक ठरला आहे.
आपल्या परिस्थितीची जाण ठेवत सागरने त्याच्या वडिलाला व्यवसायात मदत करणे सुरु केले. उन्हाळ्यात सुटीच्या कालावधीत तो कुलर दुरुस्तीचे काम करतो. खेळण्या बागडण्याच्या वयात सागर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसत आहे. शालेय शिक्षणासह सभोवतालची परिस्थिती विद्यार्थ्यांना कशी घडविते यावर बरेच काही अवलंबून असते. परिस्थितीशी चार हात करण्याचे बळ, जिद्द, चिकाटी या जोरावर आपले स्वप्न पूर्ण करण्याची कला ज्यांना अवगत असते तेच यशस्वी होताना दिसतात. याचाच परिचय सागर देतो. सध्या शालेय परिक्षांची धामधुम सुरू आहे. यात तो अभ्यासही पूर्ण करतो. परीक्षा असल्याने विद्यार्थी अभ्यासात मग्न आहेत. परंतु सागर व वैभव मात्र याला अपवाद असल्याचे दिसते. अभ्यास करुन ते कुलर दुरुस्ती करतात.
सूर्य आग ओकू लागल्यामुळे सगळीकडे कुलर सुरू झाले आहे. दुरूस्तीच्या कामांना वेग आला आहे. सागर व वैभव हे दोघेही दिवसाला ४ ते ५ कुलर दुरूस्त करतात. सागरच्या वडिलांचा मोटार रिवाईडींगचा व्यवसाय आहे. त्यांच्या कामात मदत करताना सागरने दुरूस्तीचे प्रशिक्षण कधी घेतले हे त्यांना कळले नाही. शाळा आटोपल्यावर अभ्यास करुन फावल्या वेळात सागर व वैभव दोघेही कुलर दुरूस्तीच्या कामाला निघतात. कुलर दुरुस्ती झाल्यावर अभ्यास करतात. सागर व वैभवच्या होतकरूपणाचे परिसरात कौतुक होत आहे. या दोघांचे कार्य अन्य विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत ठरावे, असे आहे.(तालुका प्रतिनिधी)

मित्राला दिला रोजगार
होतकरू विद्यार्थ्यांनी कुलर दुरूस्तीच्या कामातून रोजगार उपलब्ध केला. इयत्ता नववीतील सागर व वैभव दिवसाला ४ ते ५ कुलरची दुरूस्ती करतात.
सागरने त्याच्या मित्राला प्रशिक्षण देत रोजगार मिळवून दिला आहे. शिक्षणासोबत व्यवसाय प्रशिक्षणात हे विद्यार्थी पारंगत आहे. कुलर दुरूस्त करून वडिलांना व्यवसायात मदत करताच शिवाय पैसे कमवितात.
दोघेही घरी जावून कुलर दुरूस्ती करून देतात. त्यामुळे नागरिक देखील आनंदाने त्यांना बोलावितात. कुलर दुकानात नेवून दुरूस्तीसाठी कष्ट करण्याऐवजी घरीच सेवा मिळत असल्याने त्रास कमी होतो. यात कधी वायरिंग व तांत्रिक अडचण आल्यास सागर त्याच्या वडिलांची मदत घेतो. हे दोघेही कौतुकाचा विषय ठरत आहे.

Web Title: School Student's Successful Kular Correctional Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.