शालेय परिवहन समिती आता होतेय आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:00 AM2018-10-18T00:00:09+5:302018-10-18T00:01:06+5:30
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन होणे क्रमप्राप्त आहे; पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही समितीच नसल्याचे बोलले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन होणे क्रमप्राप्त आहे; पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही समितीच नसल्याचे बोलले जाते. प्रत्येक शाळेत सदर समिती स्थापन व्हावी आणि समिती सदस्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या नेतृत्त्वात सध्या विशेष उपक्रम राबविल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षणाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केले जात असून जिल्ह्यातील सर्व शाळांमधील शालेय परिवहन समिती आॅनलाईन केल्या जात आहेत.
उल्लेखनिय म्हणजे यापूर्वी सोलापूरात या यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. त्याच पाश्वभूमिवर वर्धेत हा प्रयोग केला जात आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या पाल्याकडे काही प्रमाणात पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी बहूतांश शाळांमध्ये स्कूल व्हॅन आहेत. परंतु, काही स्कूल व्हॅन मध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पाहिजे त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने केलेल्या काही कारवाईत पुढेही आले आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून सोलापूर नंतर वर्धेत हा उपक्रम राबविण्याचा मानस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांचा आहे. प्रत्येक शाळांमधील शालेय परिवहन समिती आॅनलाईन करण्यासाठी सध्या उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यात १ हजार ५१९ शाळा
जिल्ह्यात १ हजार १७३ प्राथमिक तर ३४६ माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमधील शालेय परिवहन समितीची माहिती यापुढे एका क्लिकवर मिळणार आहे. या सर्व शाळांनी आपल्याकडील शालेय परिवहन समितीची माहिती व इतर आवश्यक माहिती आॅनलाईन पद्धतीचा वापर करून वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विशेष वेबसाईट अपलोड करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले.
अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक सांभाळणार जबाबदारी
कमीत कमी सहा सदस्य असलेल्या या शालेय परिवहन समितीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी शासन निर्देशाप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहणार आहे. या समितीत शाळेच्या मुख्याध्यापकांसह प्रतिनिधी म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक, पोलीस विभागातील एक अधिकारी, पालक प्रतिनिधी आदींचा समावेश असणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले.
शंभरहून अधिक शाळांनी आॅनलाईन माहिती भरली
वर्धा जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा एकूण १ हजार ५१९ शाळा असून सध्यास्थितीत शंभराहून अधीक शाळांनी त्यांच्या येथे असलेल्या शालेय परिवहन समितीची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वेबसाईटवर भरली असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित शाळांनीही ही माहिती भरावी यासाठी शिक्षणाधिकाºयांना पत्र पाठविण्यात आले आहे. पण, त्यांच्याकडून कासवगतीनेच कार्य होत असल्याचे बोलले जात आहे.