शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा असुविधांच्या गर्तेत
By admin | Published: September 3, 2016 12:15 AM2016-09-03T00:15:28+5:302016-09-03T00:15:28+5:30
शाळा स्तरीय विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. देशाकरिता खेळाडू निर्माण व्हावे व ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणांना चालना मिळावी,
मैदानात गवत व मोठमोठे खड्डे : लक्ष विचलित होताच अपघाताचा धोका
वर्धा : शाळा स्तरीय विविध क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. देशाकरिता खेळाडू निर्माण व्हावे व ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणांना चालना मिळावी, याकरिता या स्पर्धा आयोजित असल्याचे बोलले जाते; मात्र या खेळाडुंना सुविधा पुरविण्यात शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. असाच काहीसा प्रकार तालुकास्तरीय व्हॉलीस्पर्धेत दिसून आला आहे. स्थानिक पातळीवर असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव, साहित्याची कमतरता आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे.
वर्धा तालुक्याच्या शालेय स्तरावरील विविध व्हॉलीबॉल स्पर्धा क्रीडा संकुलातील मैदानावर घेण्यात आल्या. या मैदानाच्या बाजूचे गवतही व्यवस्थित काढण्यात आले नव्हते. स्पर्धेकरिता म्हणून वेळेवर तयार केलेले मैदान होते. यावरच शालेय गटातील स्पर्धा पार पडल्या. याशिवाय या मैदानाच्या बाजूला असलेले खोल खड्डेही खेळाडूंकरिता धोकादायक होते. अशा स्थितीत खेळाडूंनी येथे उत्कृष्ट कामगिरी करावी अशी अपेक्षा असते; मात्र खेळाडूंना द्यावयाच्या प्राथमिक स्तरावरील सुविधा पुरविण्यास टाळाटाळ होतो. हाच प्रकार या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आला. या सर्व असुविधांच्या परिणाम थेट खेळाडूंच्या कामगिरीवर होतो, याचा विसर कदाचित शासनाला पडला असावा. (शहर प्रतिनिधी)
मैदानावरील गवतामुळे खेळाडू पडण्याची भीती
विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा या एका दिवसाच्या निर्णयातून झालेल्या नसाव्या, असे येथे येणाऱ्या प्रेक्षकांना वाटने सहज आहे. या स्पर्धेची कल्पना असताना त्याकरिता योग्य मैदान तयार करण्याची जबाबदारी आयोजकांनी होती; मात्र वर्धेत असे झाले नाही. विद्यार्थ्यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता जिल्हा क्रीडा संकुलातील मैदानाचा वापर करण्यात आला. या मैदानावर आजुबाजूला मोठ्या प्रमाणात गवत असल्याचे दिसून आले आहे. या गवतामुळे खेळताना विद्यार्थी घसरून पडण्याची शक्यता होती. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या काळजीमुळे येथे कुठलीही घटना घडली नाही.
मैदनाच्या या तयारीमुळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धांबाबत क्रीडा विभाग किती सजग आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. मैदानावर केवळ गवतच नाही तर येथे टाकण्यात आलेल्या मातीत बारीक गोटे असल्याने विद्यार्थ्यांच्या पायाला इजा झाल्याचे दिसून आले आहे. हे खेळाडू ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यातील गुणांना कमी लेखण्याचा प्रयत्न येथे झाल्याचा आरोप काही जणांकडून करण्यात आला आहे. असे असेल क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांनी अशी व्यवस्था करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज वर्तविली जात आहे.
मैदानाशेजारीच खोल खड्डे
व्हॉलीबॉलच्या स्पर्धा झाल्या त्या मैदनालगत मोठ मोठे खड्डे असल्याचे दिसून आले. खोदण्यात आलेले खड्डे मैदानाचा विस्तार करण्याकरिता असल्याचे सांगण्यात आले; मात्र हे खड्डे खोदून बराच काळ झाल्याचे त्याकडे पाहून वाटत आहे. खोदलेल्या खड्ड्यात झाडे उगविली असून ती मैदानाच्या शेजारीच आहेत. येथे खेळताना जर एखाद्या खेळाडुचे याकडे दुर्लक्ष झाले तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्पर्धेदरम्यान तसे झाले नाही.
या मैदानावर असे मोठे खड्डे असताना आयोजकांनी या मैदानाची निवड करून खेळाडुंचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार केला आहे. यामागचे कारण काय, याचा विचार करणे गरजेजे झाले आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.