जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पुन्हा ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:00 AM2021-02-20T05:00:00+5:302021-02-20T05:00:12+5:30
जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांना कोरोनामुक्त ठेवणे तसेच जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळून इतर सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी निर्गमित केला आहे.
जिल्ह्यात नववी ते बारावीच्या ३२५ शाळा व कनिष्ठ महाविद्यालये आहेत. तर पाचवी ते आठवीचे शिक्षण देणाऱ्या ९९९ शाळा आहेत. हिंगणघाट तालुक्यातील एका निवासी शाळेत तब्बल १०० विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील काही शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत.
ऑनलाईन पद्धतीने देणार शिक्षण
वैद्यकीय शिक्षणाशी संबंधीत महाविद्यालय वगळता जिल्ह्यातील पाचवी ते बारावीच्या सर्व शाळा व महाविद्यालय पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असले तरी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू राहणार आहे. शिवाय शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना आपले काम नियमितपणे करता येणार आहे.
परिसर करावा लागेत निर्जंतूक
खबरदारीचा उपाय म्हणून शाळा व महाविद्यालय परिसर तसेच वर्ग खोल्या शाळा व महाविद्यालय प्रशासनाकडून निर्जंतूक करणे क्रमप्राप्त राहणार आहे.
विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये या हेतूने खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित महाविद्यालये वगळता सर्व शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तर वर्धा शहर आणि ग्रामीण भागात शनिवारी रात्री ८ वा.पासून सोमवारी २२ फेब्रुवारी सकाळी ८ वा.पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी राहणार आहे. या काळात नागरिकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.
- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.
आता ३६ तास राहणार सक्तीची संचारबंदी
कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता संसर्ग लक्षात घेता शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ पर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. या कालावधीत सार्वजनिक ठिकाणचा परिसर निर्जंतूक केला जाणार असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींवर पोलीस, महसूल व राजस्व विभागातील अधिकारी व कर्मचारी दंडात्मक कारवाई करणार आहेत.
ही प्रतिष्ठाने राहतील बंद
चहा व पानटपरी, बिगर जीवनावश्यक साहित्याचे दुकान, हॉटेल, रेस्टॉरेंट, ट्रॅव्हल्स, रापमच्या बसेस, ऑटोरिक्षा, जीम, व्यायामशाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृह, मॉल, वाचनालय, ग्रंथालय, आठवडी बाजार, पर्यटनस्थळ, पार्क, बगीचे, पेट्रोलपंप, खासगी व शासकीय बँका आदी बंद राहणार आहे.