विज्ञानच सर्व समस्यांचे समाधान

By admin | Published: April 10, 2016 02:28 AM2016-04-10T02:28:59+5:302016-04-10T02:28:59+5:30

आजच्या युगात मानवासमोर अनेक नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा विचार केला तर विज्ञानाच्या माध्यमातूनच ....

Science is the solution to all the problems | विज्ञानच सर्व समस्यांचे समाधान

विज्ञानच सर्व समस्यांचे समाधान

Next

ओम महोदय : वर्तमान भारतीय विज्ञान शिक्षण प्रणालीवर वादविवाद स्पर्धा
वर्धा : आजच्या युगात मानवासमोर अनेक नवनवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांचा विचार केला तर विज्ञानाच्या माध्यमातूनच या आव्हानांचे समाधान शोधले जावू शकते. केवळ गरज आहे ती संबंधितांनी प्रमाणिकपणे शिक्षण-प्रणालीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी केले.
जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय आणि इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्तमान भारतीय विज्ञान शिक्षण प्रणाली जागतिक आव्हानांचा सामना करण्यास समर्थ आहे’ या विषयावर आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अल्का चतुर्वेदी, उपाध्यक्ष भरत महोदय यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी संजय भार्गव म्हणाले, विज्ञान शिक्षण प्रणालीला अर्थशास्त्राची जोड देणे काळाची गरज झाली आहे. वादविवाद स्पर्धेच्या विषयाबाबत विचार व्यक्त करताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्पष्ट व जाणीवपूर्वक विचार करून खऱ्या व्यावहारिकतेला विकसित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी चांगल्या विचारांना आत्मसात करून रोजगार व उत्पादकता या वर्तमान आव्हानाचा नेटाने सामना करणे गरजेचे आहे. भरत महोदय यांनी देशांतर्गत विज्ञान विषयक समस्या व त्यावरील उपाययोजना यावर विचार व्यक्त केले. डॉ. अल्का चतुर्वेदी यांनी इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनची कार्यशैली विशद केली.
या वादविवाद स्पर्धेत कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर येथील प्रणय साधु या विद्यार्थ्यांने प्रथम, जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी अश्विनी चालनकर हिने द्वितीय तर तृतीय क्रमांक पांडव महाविद्यालय नागपूर येथील साईकविता नगटे यांनी पटकावला. त्याचबरोबर बजाज महाविद्यालयाची सुचिता नागपुरे आणि एमजीआयएमएस सेवाग्राम येथील सारंग बोंबटकर यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त केले.
या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण न्यू इंग्लिश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डब्ल्यु एस लेकुरवाळे, बी.डी. कॉलेज आॅफ इंजिनियरिंग येथील भौतिकशास्त्राचे अधिष्ठाता प्रा. डब्ल्यु के. किनगे व महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वसुधा वनमाली यांनी केले. याप्रसंगी सावेरी सोनी या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन गझल चांडक व अनघा बरवट यांनी केले. आभार प्रा. नकुल बरवट यांनी मानले. यावेळी डॉ. उल्का मालोदे यांनी स्पर्धेचे नियम वाचून दाखविले. कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)

Web Title: Science is the solution to all the problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.