सर्पदंश झालेल्या अंकीताचा जगण्यासाठी आकांत
By admin | Published: April 13, 2017 01:38 AM2017-04-13T01:38:09+5:302017-04-13T01:38:09+5:30
येथील अंकीता प्रभाकर कुकडे या इयत्ता अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला दोन महिन्यांपूर्वी घरीच सर्पदंश झाला.
श्वसनाचा आजार : शस्त्रक्रियेसाठी मदतीची गरज
नारायणपूर : येथील अंकीता प्रभाकर कुकडे या इयत्ता अकराव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला दोन महिन्यांपूर्वी घरीच सर्पदंश झाला. यावर वैद्यकीय उपचार केले; पण विषामुळे अंकिताला स्वासनलिकेचा आजार जडला. श्वास घेणे कठीण झाल्याने श्वासनलिकेच्या शस्त्रक्रियेसाठी दीड लाख रुपये खर्च सांगितला आहे. आई-वडील शेतमजूर असून तिला वाचविण्यासाठी शासकीय तथा दानशुरांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दोन महिन्यांपूर्वी अंकीताला झोपेतच सर्पदंश झाला. त्वरित सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण प्रवासात काही काळ गेल्याने विषाचा प्रभाव स्वासनलिकेवर झाला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अंकीताला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले; पण विषाने श्वासनलिकेवर आघात केल्याने तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. यामुळे तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी तिला ‘सयब्लोटीक स्टेनोसीस’ नावाचा आजार असल्याने मुंबई येथे शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. दरम्यान, नागपूरचे डॉ. मदन कापरे यांच्याकडे तपासणी केली असता त्यांनी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. एवढा मोठा खर्च प्रभाकरला न झेपणारा असल्याने त्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज केला; पण हा आजार मदत निधीच्या यादीत नसल्याने असमर्थता दर्शविण्यात आली. परिणामी, कुकडे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. अंकिताला जगण्यासाठी माणुसकीची गरज आहे. सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींनी अंकिताला शस्त्रक्रियेसाठी बॅँक आॅफ महाराष्ट्र नंदोरी येथील ६०१४७८२९०९३ क्रमांकाच्या खात्यात आर्थिक सहकार्य करावे, अशी विनवणी प्रभाकर कुकडे यांनी केली आहे.(वार्ताहर)