मिशन‘दीपस्तंभ’करिता वर्ध्याच्या सीईओंना ‘स्कॉच’पुरस्कार
By आनंद इंगोले | Published: September 27, 2023 07:06 PM2023-09-27T19:06:35+5:302023-09-27T19:06:46+5:30
राष्ट्रीय स्तरावर होणार सन्मान : देशातील तीन हजार स्पर्धकांचा सहभाग
वर्धा: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिमिरातूनी तेजाकडे नेण्याकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पेतून विविध प्रयोग राबविले जात आहे. यातूनच मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्याचा गुणवत्ता विकास साधला. याचीच फलश्रृती म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना देशातील नामांकीत ‘स्कॉच’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. लवकरच राष्ट्रीय स्तरावर हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
नामांकित अशा ‘स्कॉच’ पुरस्काराकरिता देशभरातील तब्बल तीन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यातून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची याकरिता निवड झाल्याने वर्धा जिल्हा परिषदेच्या यशस्वी परंपरेत मानाचा तुरा रोवल्या गेला. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याकरिता त्यांनी केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा पातळीवरुन राबविल्या जाणाºया उपक्रमांत एकसंघता आणली.
फाउंडेशन लर्निंग अॅण्ड न्यमेरसीची उद्दिष्टे निर्धारित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यासाठी नियमित अंतराने विद्यार्थ्यांच्या संपादणुकीची पडताळणी सुरु केली. पाठीमागे राहिलेल्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणा सज्ज करुन त्यांना मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्यात आली. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग वाढावा याकरिता पुढाकार घेऊन सराव परीक्षा आयोजित करुन शिष्यवृत्ती परीक्षेत दुप्पट विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेत उत्तीर्ण होण्याचेही प्रमाण वाढविले. त्यांच्या या मेहनतीचे फळच आता ‘स्कॉच’ पुरस्काराच्या माध्यमातून मिळाले आहे. त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे.