वर्ध्याच्या सीईओंना दिल्लीत स्कॉच पुरस्कार; 'मिशन दीपस्तंभ'ची दखल
By आनंद इंगोले | Published: November 19, 2023 06:05 PM2023-11-19T18:05:01+5:302023-11-19T18:05:12+5:30
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन दीपस्तंभ’ राबविण्यात आले होते.
वर्धा: जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून ‘मिशन दीपस्तंभ’ राबविण्यात आले होते. याकरिता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याने या मिशनमधून विद्यार्थ्यांनी तिमिरातून तेजाकडे झेप घेतली. याचीच दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांना दिल्लीमध्ये ‘स्कॉच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मंगेश घोगरे यांचीही उपस्थिती होती.
देशातील नामांकित स्कॉच पुरस्काराकरिता देशभरातील तीन हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यामध्ये ‘मिशन दीपस्तंभ’ करिता वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची निवड होऊन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. अखेर ११ नोव्हेंबरला दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये समीर कोच्चर आणि रोहन कोच्चर यांच्या हस्ते मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि त्यांना या मिशनमध्ये सहकार्य करणारे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना स्कॉच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराने जिल्हा परिषदेच्या यशस्वी परंपरेमध्ये मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.
या कर्तव्यपूर्तीसाठी मिळाला सन्मान
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे जिल्ह्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याकरिता केंद्र व राज्य शासन तसेच जिल्हा पातळीवरुन राबविल्या जाणाºया उपक्रमांत एकसंघता आणली. यामध्ये डायटचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांनीही भर घातली. फाउंडेशन लर्निंग अॅण्ड न्युमेरेसीची उद्दिष्टे निर्धारित कालावधीपूर्वी पूर्ण करण्यासाठीनियमित अंतराने विद्यार्थ्यांच्या संपादणूक चाचणीची पडताळणी सुरु केली. मागे राहिलेल्या शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यवेक्षीय यंत्रणा सज्ज करुन त्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग वाढावा याकरिता पुढाकार घेऊन सराव परीक्षा आयोजित करुन विद्यार्थ्यांचा दुप्पट सहभाग वाढविला आणि उत्तीर्ण होण्याचेही प्रमाण वाढविले. यामुळेच जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला.