रेल्वे वसाहतीत डेंग्यूचा कहर; शंभरावर आढळले सदृश रुग्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2021 05:00 AM2021-09-01T05:00:00+5:302021-09-01T05:00:02+5:30
रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे रेल्वे वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते; मात्र वर्धा रेल्वे स्थानक परिसराच्या बाजूला असलेल्या रेल्वे वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वसाहत परिसरात असलेल्या उद्यानाची अत्यंत खस्ता हालत झाली असून, गाजरगवत वाढले आहे. रेल्वे इन्स्टीट्यूटचीदेखील खराब अवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनापाठोपाठ आता डेंग्यू आजाराने डोके वर काढले आहे. अशातच रेल्वे वसाहतीत मात्र कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून, साधी फवारणी देखील केल्या जात नसल्याने रेल्वे वसाहतीत शंभरावर डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. याकडे रेल्वे विभागाने लक्ष देण्याची मागणी वसाहतीतील रहिवासी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
रेल्वे विभाग हा केंद्र सरकारच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे रेल्वे वसाहतीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते; मात्र वर्धा रेल्वे स्थानक परिसराच्या बाजूला असलेल्या रेल्वे वसाहतीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वसाहत परिसरात असलेल्या उद्यानाची अत्यंत खस्ता हालत झाली असून, गाजरगवत वाढले आहे. रेल्वे इन्स्टीट्यूटचीदेखील खराब अवस्था झाली आहे. याची देखभाल दुरुस्ती करण्याकडे मात्र कुणीही दखल घेत नसल्याचा आरोप वसाहतीतील कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
सध्या डेंग्यू या जीवघेण्या आजाराने कहर केला आहे. रेल्वे वसाहतीत सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे वसाहतीतील अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे. विशेष म्हणजे याची कुठेही नोंद घेण्यात येत नसल्याने नेमका हा आकडा किती, हे समजायला मार्ग नाही. यासंदर्भात रेल्वे विभागाच्या आरोग्य निरीक्षक साठोने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
काही दिवसांपूर्वी डेंग्यूने घेतला युवकाचा जीव
काही दिवसांपूर्वी रेल्वे वसाहतीतील रहिवासी कर्मचाऱ्याच्या १६ वर्षीय मुलाला डेंग्यूने ग्रासले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्या विंगमध्ये अनेकांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती आहे. हे झाल्यानंतर तेथील देखभाल व दुरुस्ती विभागाला जाग आली आणि त्यानंतर फवारणी करण्यास सुरुवात झाल्याचीही माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी दिली.
निवासस्थाने जीर्ण, मेंटेनन्सकडे दुर्लक्ष
रेल्वे वसाहतीतील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. काही निवासस्थाने जीर्ण झाली असून, स्लॅबला तडेदेखील गेलेले आहेत; मात्र ना पेंटींग, ना देखभाल, ना दुरुस्ती होत असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. याकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.