हुतात्मा स्मारकाच्या अस्तित्वावर ओरखडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 05:00 AM2020-05-23T05:00:00+5:302020-05-23T05:00:14+5:30
चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेले हे वटवृक्ष आजही स्वातंत्र्यकाळाचे साक्षीदार म्हणून डौलाने उभे आहेत.
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : चलेजाव आंदोलनाच्या साक्षीदार असलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकास अनेक वर्षांपासून भंगाराने विळखा घातला असून स्मारकाची पडझड झाली आहे. आर्वीतील नेते, समाजसेवक, शासकीय अधिकारी, नगर पालिका प्रशासनाची याकडे डोळेझाक होत असल्याने माणुसकीचा झराही आटू लागला की काय, असे वाटू लागले आहे.
चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेले हे वटवृक्ष आजही स्वातंत्र्यकाळाचे साक्षीदार म्हणून डौलाने उभे आहेत. लकडगंज परिसर, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, गणपती वॉर्डातील घोड्याच्या मंदिराजवळ आणि एक कसबा येथे हे अक्षय वट लावण्यात आले होते. त्यानंतर लकडगंज येथील या अक्षयवृक्षाखाली चलेजाव चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारकही बांधण्यात आले होते.
या स्मारकाची काही वर्षे निगा राखण्यात आली. कालांतराने दुर्लक्ष करण्यात आले. आता अनेक वर्षांपासून भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या एकाने परिसर ताब्यात घेतला.
एवढेच नव्हे, तर स्मारकाच्या संरक्षण भिंतीच्या आतही मोठ्या प्रमाणात भंगार अस्ताव्यस्त पडलेले आहे. स्मारकाची मोडतोड झाली आहे. या स्मारकाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यावर संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. त्यानंतर या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेले आणि या हुतात्मा स्मारकास भंगाराचा विळखा अधिकच घट्ट होत गेला.