चरखागृहात उभारले जाणार बापू, विनोबांचे शिल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:00 AM2020-08-26T05:00:00+5:302020-08-26T05:00:19+5:30
चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जागतिकस्तरावर आजपर्यंत भंगारातून शिल्प तयार केल्या गेलेले नाही. महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे पहिलेच आणि सर्वात मोठे वैशिष्टयपूर्ण शिल्प असून याची स्थापना अण्णासागर तलावाजवळ जवळ न करता ते चरखागृह परिसरात करण्यात येणार असल्याची माहिती तज्ज्ञ समितीतील सर जे.जे.स्कूल ऑफ आटर््सचे प्रा.विजय बोंदर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रा.बोंदर यांनी सुरूवातीला अण्णा सागर ही जागा दोन्ही शिल्प उभारण्यासाठी निवडली होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे ती जागा रद्द करून चरखागृहाची जागा निश्चित करण्यात आली. सेवाग्राम-वर्धा हा महत्त्वपूर्ण मार्ग आहे. रस्त्याच्या दिशेने शिल्प उभारण्यात येणार असल्याने ये- जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे. याच ठिकाणी जागतिक दर्जाचा चरखा आहे. चरखागृहात चरखा आणि ग्रामीण जीवन, उद्योग यावर प्रकाश टाकणारी चित्रे असून ऑडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार असल्याने पर्यटकांना गांधींचे स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, विचार आणि परंपरागत भारतातील व्यवसाय समजून घेता येईल. दोन सिमेंटचे चबुतरे तयार आहेत. सोमवारपासून दोन्ही शिल्पाचे भाग चरखागृह परिसरात आणण्यास प्रारंभ झाला आहे. याच ठिकाणी ते जोडून उभे करण्यात येणार आहे. जवळपास नऊ महिने विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम करून शिल्प तयार केले आहे.
यासाठी पालकमंत्री सुनील केदार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मे. अडारकर असोसिएट मुंबई, सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे निर्मिती विभाग, तज्ज्ञ समितीचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे, असे सांगितले. यावेळी अधिव्याख्याता विजय सकपाळ यांनी नीलपंख या पक्षाच्या निर्मितीविषयी माहिती दिली.
दोन्ही महामानवांचे जीवन व कार्य राष्ट्र आणि मानवतेसाठी राहिले आहेत. दोघांचेही विचार मूल्य आजही जगाच्या कल्याणासाठी असल्याचे जगाने मान्य केले आहे. सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत चरखागृह आणि शिल्पाचे काम करण्यात येत असून वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे.
भंगार साहित्यातून शिल्पनिर्मिती
बा-बापू यांचे १५० वी जयंती वर्ष आहे. सेवाग्राम-वर्धा बापूंची कर्मभूमी, प्रयोगभूमी असल्याने त्यांच्या विचार व कार्याच्या स्मृती जोपासण्यात याव्या, जागतिक दर्जाचे वैशिष्टयपूर्ण कार्य स्मारकाच्या माध्यमातून व्हावे या दृष्टिकोनातून चरखागृह, मेटल स्कॅ्रपमधून शिल्प निर्माण करण्यात आले आहे.