शहरातील २२ प्रतिष्ठाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:07+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, १३ मार्च पासून लागू करण्यात आला आहे. त्यातील खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार जिल्ह्यात १४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या प्रतिष्ठानांमध्ये सोशल डिस्टंन्सिगसह प्रशासनाने सूचविलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वर्ध्यातील तब्बल २२ प्रतिष्ठांना सील ठोकले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आता इतर दुकानदारांनीही प्रशासनाच्या उपाययोजनांचे काटेकारपणे पालन करायला सुरुवात केली आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, १३ मार्च पासून लागू करण्यात आला आहे. त्यातील खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार जिल्ह्यात १४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत बाजारोतील किराणा दुकाने, इतर जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला व औषधी दुकाने ठराविक वेळेकरिता सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. या दुकानदारांनी गर्दी टाळण्याकरिता दुकानात सोशल डिस्टन्सिंग, हॅन्ड वॉशची सुविधा व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दुकानदारांना दिले होते. मात्र, दुकानदारांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी संबंधित दुकानदारांवर दंडात्मक किंवा आवश्यकता असल्यास सील करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप व नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी आपल्या पथकांसह शहरातील दुकानांची पाहणी करुन २२ दुकानांना सील ठोकले आहे. या कारवाईने अनेकांनी धसका घेतला.
यांच्यावर झाली कारवाई
पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने बुधवारी दिवसभर शहरातील विविध भागात जात प्रतिष्ठानांवर कारवाई केली. यादरम्यान सिंदी लाईन परिसरातील प्रताप ट्रेडर्स, तरुण ट्रेडर्स, कनफेक्शनरी, महेंद्र ट्रेडर्स, भगवान ट्रेडर्स, डी.के. ट्रेडर्स, राजकला टॉकीज रोडलगतच्या मालगुडी किराणा भंडार, अपना स्टोअर्स यांच्यासह निर्मल बेकरी लगतचे छगनलाल जयचंद गांधी किराणा स्टोअर्स, दोशी ब्रदर्स, पूजा टायर व बाईक सर्विसिंग सेंटर, साई आॅथटिक अॅण्ड प्रास्थेटिक सेंटर, मनजीत सुपर शॉपी, हरीष गोपाल जनरल स्टोअर्स, एच.आर.ए.चीनी, शिव मार्केटिंग, एस.गुप्ता अनाज विके्रता, साई रिवार्इंडींग वर्क्स, ओम प्रोव्हिजन स्टोअर्स, ओम साई मोबाईल शॉपी व होलाराम पाचोळ तेल दुकान या प्रतिष्ठानांची पाहणी केली असता तेथे उपाययोजनांचा अभाव दिसल्याने सील ठोकण्यात आले.
सेलूत डॉक्टरला पाच हजारांचा दंड, डॉक्टरकडून कारवाईवर आक्षेप
सेलू : येथील डॉ. राजेंद्र त्रिवेदी यांच्या दवाखान्याला तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी मंगळवारला भेट दिली असता हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर ऐवजी यापेक्षा महागडे स्ट्रेरिलियम हे जंतुनाशक असताना त्यांना पाच हजारांच्या दंडाची पावती देण्यात आली. मुख्याधिकारी व तहसीलदार यांना वैद्यकीय व्यवसायातील माहिती नसते त्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना या जंतुनाशकाबाबत खात्री करून दंड आकारणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी डॉक्टरांचे म्हणणे ऐकून न घेता सरळ दंडात्मक कारवाई केल्याचा आरोप डॉ. त्रिवेदी यांनी केला आहे. वैद्यकीय अधिकारी जर मी वापरलेले जंतुनाशक वापरणे चुकीचे आहे,असे म्हणत असतील तर मी दंडाची रक्कम भरण्यास तयार असल्याचा खुलासा डॉ. त्रिवेदी यांनी केला आहे. यापूर्वी सेलू नगरपंचायतीच्या वतीने एका डॉक्टराला सॅनिटायझर ठेवले नाही म्हणून १८० रुपये दंड करण्यात आला मात्र सॅनिटायझर ऐवजी दुसरे जंतुनाशक असताना पाच हजारांचा दंड करण्यामागील विसंगतीही विचार करायला लावणारी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.