वर्धेत निलंबित बीटीची ४,६१५ पाकिटे सील
By admin | Published: May 22, 2017 01:45 AM2017-05-22T01:45:26+5:302017-05-22T01:45:26+5:30
खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. यात अनेक बनावट बियाणे आणि खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची
शेतकऱ्यांना सावधानीचा इशारा : गत हंगामात बनावटीच्या प्रकारातून ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : खरीपाचा हंगाम तोंडावर आला आहे. यात अनेक बनावट बियाणे आणि खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची प्रकरणे आहेत. यात कृषी संचालकांनी नुकतेच निलंबित केलेली बीटी बियाणे बाजारात असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. यावरून कृषी विभागाने निलंबित केलेल्या ‘राशी ६५९’ या वाणाची बीटी बियाणे सील केली आहे. या कंपनीने कृषी संचालकांच्या कारवाई विरोधात वरिष्ठाकडे धाव घेतली आहे. यावर निर्णय होईपर्यंत या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात बीटी बियाण्यांच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहे. गत हंगामात कारंजा येथे बोगस कापूस बियाणे विक्री आणि साठवणूक प्रकरणी चंद्रशेखर फरकाडे याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. तसेच बोगस रासायनिक खत साठवणूक केल्याप्रकरणी हिंंगणघाट तालुक्यातील सास्ताबाद येथील सुभाष चौधरी व मंगेश चौधरी तसेच गुजरात येथील अश्विन पटेल या तिघांचर गुन्हा दाखल केला होता. तर बोगस किटकनाशक विक्री प्रकरणी वर्धेतील रामचंद्र मोहरकर नामक व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर तक्रार करताच पोलीस कारवाई झाल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
यंदा पावसाळा लवकर असल्याचे वेधशाळेने जाहीर केले आहे. शेतकरी आपल्या कामात व्यस्त झाला आहे. यामुळे लवकरच बळीराजाकडून बी-बियाणे व खतांच्या खरेदीची लगबग सुरू होणार आहे. त्याची घाई पाहून बाजारात बोगस बियाणे आणि खत विक्री करणाऱ्यांकडून त्याची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. कोणतेही बियाणे खरेदी करताना त्याची पावती अवश्य घ्यावी अशा सूचना आहेत.
९१ कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द
४गत हंगामात बोगस बियाणे, खत व किटकनाशक विक्री प्रकरणी कृषी विभागाच्यावतीने चांगलीच कामगीरी केली. कृषी विभागाच्यावतीने बियाणे, खत व किटकनाशकाची एकूण ४५९ नमुन्यांची तपासणी केली. यात दोषी आढळलेल्या एकूण ९१ कृषीकेंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. रद्द करण्यात आलेल्या परवाण्यात २९ बियाणे विक्रेते, ३१ खत विक्रेते आणि ३१ किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दोन बियाणे विक्रेत्यांचा परवाना कायमस्वरूपी निलंबित करण्यात आला आहे. तर ंिबयाणे, खत आणि किटकनाशकाची प्रत्येकी एक अशी तीन प्रकरणे पोलिसांत दाखल करण्यात आली आहेत.
३५ व्यावसायिकांना विक्रीबंदचे आदेश
४कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या मोहिमेत जिल्ह्यतील एकूण ३५ व्यावसायिकांना विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यात २९ बियाणे विक्रेते, चार खत दोन किटकनाशक विक्रेत्यांचा समावेश आहे.
कृषी संचालकांच्या आदेशावरून बीटीचे ‘राशी ६५९’ हे वाण जप्त करण्यात आले आहे.
- संजय बमनोटे, सहायक जिल्हा कृषी अधिकारी, जि.प. वर्धा