शोध घ्या, सत्य सापडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 10:19 PM2019-07-06T22:19:00+5:302019-07-06T22:20:17+5:30
सोशल मीडियावरून सातत्याने गांधींबाबत अपप्रचार केला जात आहे. युवा पिढी या फोडणी दिलेल्या फोटोशॉपी पोस्टलाच सत्य समजते. वस्तुत: गांधींचा इतिहास फार प्राचीन नसल्यामुळे प्रत्येक बाबींचे पुरावे आणि संदर्भ आज सहज उपलब्ध आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सोशल मीडियावरून सातत्याने गांधींबाबत अपप्रचार केला जात आहे. युवा पिढी या फोडणी दिलेल्या फोटोशॉपी पोस्टलाच सत्य समजते. वस्तुत: गांधींचा इतिहास फार प्राचीन नसल्यामुळे प्रत्येक बाबींचे पुरावे आणि संदर्भ आज सहज उपलब्ध आहेत. अशावेळी शंका निर्माण झाली की ऐतिहासिक दस्तावेज तपासत सत्याचा शोध आपण स्वत:च घेतला तर सत्य सहज सापडते, असे प्रतिपादन महात्मा गांधी यांचे पणतू आणि ‘लेट्स किल गांधी’ या बहुचर्चित ग्रंथाचे लेखक तुषार गांधी यांनी सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विद्यापीठाद्वारे तुषार गांधी यांचे ‘महात्मा गांधी : समज, गैरसमज आणि वास्तव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. ए. जे. अंजनकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. भुतडा, संजय इंगळे तिगावकर यांची उपस्थिती होती.
ज्यांच्याकडे सत्य नाही अशी माणसे असत्याच्या आधारावरच आणला उदरनिर्वाह करीत असतात, असे सांगून तुषार गांधी पुढे म्हणाले, इतिहासाचे विकृतीकरण करणे सोपे आहे; पण इतिहास घडविणे हे कठीण कार्य आहे. इतिहास ही नीरस वाटणारा विषय ठरला तरी देश आणि इथला समाज समजून घ्यायचा असेल तर आधी इतिहास समजून घ्यावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा गांधी आणि भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, पंडित नेहरू आदी अनेक व्यक्तींसंदर्भात पसरविल्या जाणाऱ्या गैरसमजांचे तुषार गांधी यांनी ऐतिहासिक दाखले देत खंडन केले. गांधींमुळे फाळणी झाली किंवा पाकिस्तानला ५५ कोटी गांधींच्या हट्टामुळे देण्यात आले, या अपप्रचारांचे स्पष्टपणे खंडन करीत त्यांनी वास्तववादी मांडणी केली. फाळणीचा निर्णय हा अपरिहार्य होता आणि फाळणीनंतर होणाºया वाटणीत पाकिस्तानला ७५ कोटी देण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या पूर्वगठित मंत्रिमंडळाने घेतला होता. या राजकीय निर्णयात गांधींची कोणताही भूमिका नव्हती. फाळणीची २० कोटी अग्रीम राशी आधीच देण्यात आली होती. मात्र, फाळणीनंतर ५५ कोटी रुपये देण्याबाबत अंतर्गत विवाद सुरू झाल्याने दिलेला शब्द पाळला जावा यासाठी महात्मा गांधी आग्रही होते. राष्ट्र म्हणून भारताची नव्याने जगाला ओळख होत असताना त्याचा पाया खोटेपणा व शब्दफितूरी असू नये, ही गांधींची भूमिका रास्तच होती, असेही तुषार गांधी म्हणाले.
विद्यार्थी दशेत मोहनदासचा डॉक्टर होण्याचा मानस होता. मात्र, वैष्णव परिवारात शरीराच्या चिरफाडीबाबत नकारात्मक भाव असल्यामुळे त्यांना कायद्याचे शिक्षण घेण्यास प्राधान्य द्यावे लागले. याही काळात दक्षिण आफिकेत असताना त्यांनी नर्सिंगचे शिक्षण घेतले आणि या प्रशिक्षणाचा वापर त्यांनी महायुद्धात जखमी सैनिकांची शुश्रूषा करण्यासाठी केला होता, असे तुषार गांधी यांनी सांगितले.
राग येणे ही स्वाभाविक घटना आहे. मात्र, या रागाचे रूपांतर रचनात्मक कार्यात करता आले पाहिजे, वीज जमिनीवर कोसळली तर विनाश करते आणि तिचा विद्युत प्रवाह झाला तर प्रकाश देते. त्यामुळे आपला राग हा आपली कमजोरी न बनता ताकद बनली पाहिजे, असेही ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
निसर्गातील संसाधनांचा दुरूपयोग करणे आपण जोपर्यंत थांबविणार नाही, तोपर्यंत पर्यावरणावर बोलणे व्यर्थ ठरेल, असे मत महात्मा गांधींचेच एक उदाहरण देत त्यांनी मांडले. जगाला बदलवू इच्छित असाल तर आधी स्वत: ला बदलवा, असे गांधीजींच्या शब्दात विद्यार्थ्यांना तुषार गांधी यांनी आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाचे मानचिन्ह देऊन तुषार गांधी यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानानंतर तुषार गांधी यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. तर विद्यार्थ्यांनीही अनेक प्रश्न विचारून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या विशेष व्याख्यानाला आयुर्वेद, नर्सिंग महाविद्यालय तसेच स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते. एकूणच विद्यार्थ्यांना गांधी आणि त्यांच्या विचारांची माहिती मिळाली.