जिल्ह्यात दुसऱ्या सिरो सर्व्हेला झाली सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:00 AM2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:22+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी सापडला. त्यानंतर दिवसेंदिवस जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या वाढत गेली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यावर ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने वर्धा जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवालही जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
महेश सायखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सध्याच्या कोरोनायनात वर्धा जिल्ह्यात कोविड-१९ विषाणूच्या प्रसाराची काय स्थिती आहे याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी सिरो सर्व्हे महत्त्वाचा ठरत असून जिल्ह्यात दुसऱ्या सिरो सर्व्हेला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत तब्बल एक हजारहून अधिक व्यक्तींच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आल्याचे आरोग्य यंत्रणेतील खात्रीदायक सूत्रांनी सांगितले.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी सापडला. त्यानंतर दिवसेंदिवस जिल्ह्याची कोविड बाधितांची संख्या वाढत गेली. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यावर ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने वर्धा जिल्ह्यात सिरो सर्व्हे करण्यात आला. त्याचा अहवालही जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. तर दुसरा सिरो सर्व्हे दिवाळीच्या पूर्वी होणार होता. पण लक्ष्मीपूजनाच्या काही दिवसांपूर्वी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांची नागपूर येथे बदली झाल्याने दुसरा सिरो सर्व्हे पुढे ढकलत तो दिवाळीनंतर घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर आता दुसऱ्या सिरो सर्व्हेसाठी विविध क्षेत्रातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजाराच्यावर व्यक्तीच्या रक्ताचे नमुने दुसऱ्या सिरो सर्व्हेसाठी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
१९ सप्टेंबरला सादर झाला पहिल्या सर्व्हेचा अहवाल
महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेने जिल्ह्यात करण्यात आलेल्या पहिल्या सिरो सर्व्हेचा अहवाल १९ सप्टेंबरला जिल्हा प्रशासनाला सादर केला होता. तर आता जिल्ह्यात दुसरा सिरो सर्व्हे युद्धपातळीवर केली जात आहे. १ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात २०५ कोविड बाधित ट्रेस झाले असताना सुमारे २१ हजार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. तसेच ते प्रमाण केवळ १.५० टक्के होते. शिवाय रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यास अद्याप बराच कालावधी लागणार यासह अनेक बाबींची ठोस माहिती पहिल्या सिरो सर्व्हेच्या अभ्यासातून आरोग्य विभागाला तसेच वैद्यकीय तज्ज्ञांना प्राप्त झाली होती हे विशेष.
हर्ड ह्युमिनिटीची मिळणार माहिती
विषाणू बाबत वर्ध्याकरांमध्ये हर्ड ह्युमिनिटी विकसित झाली काय याची इत्यंभूत माहिती या सिरो सर्व्हेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना मिळणार आहेत.
२,४३७ व्यक्तींच्या रक्ताचे घेणार नमुने
जिल्ह्यात होत असलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेसाठी एकूण २ हजार ४३७ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचे विश्लेशन सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत केले जाणार आहे.
कोविड-१९ या विषाणूच्या संसर्गाची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी सिरो सर्व्हे उपयुक्त ठरतो. जिल्हा प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर दुसरा सिरो सर्व्हे सध्या जिल्ह्यात केला जात आहे. त्यासाठी आतापर्यंत एक हजारहून अधिक व्यक्तींच्या रक्ताचे नमुने संकलित करण्यात आले आहे.
- डॉ. नितीन गगणे, अधिष्ठाता, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम.
आरोग्य विभाग आणि सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्यावतीने जिल्ह्यात दुसरा सिरो सर्व्हे केला जात आहे. नागरिकांच्या रक्ताचे नमुने सध्या संकलित केले जात असून त्यानंतर त्याचे प्रयोगशाळेत विश्लेशन केले जाणार आहे.
- डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.