सिंदीत स्वाईन फ्लूूचा दुसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:59 PM2019-03-16T23:59:17+5:302019-03-16T23:59:56+5:30
शहरात मागील एक महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या आजाराने थैमान घातले आहे. परंतु, उपाययोजना करण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. अशातच स्वाईन फ्लूच्या आजाराची लागण होऊन आणखी एकाचा बळी गेल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदी (रेल्वे): शहरात मागील एक महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या आजाराने थैमान घातले आहे. परंतु, उपाययोजना करण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. अशातच स्वाईन फ्लूच्या आजाराची लागण होऊन आणखी एकाचा बळी गेल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बबलू जगदेव असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक वॉर्ड क्र. ३ मधील सुनील महादेव कळमकर (५०) यांचा यापूर्वी स्वाईन फ्लूच्या च्या आजाराने मृत्यू झाला आहे. परंतु, प्रभावी उपाययोजना करण्याकडे न.प.प्रशासनासह आरोग्य विभाग दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानत आहे. स्वाईन फ्लूने शहरात दुसरा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील मोठी मशिदीजवळ राहणाऱ्या बबलू जगदेव यांना प्रकृती बिघडल्याने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बबलूच्या कुटुंबीयांना सांगितले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहरात अस्वच्छतेने कळस गाठला असून स्थानिक नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानतच असल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे कायम असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य विभागासह न.प. प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.