दुसरी लाट; 24 एप्रिलला ऑक्सिजनचा सर्वाधिक वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2021 05:00 AM2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:42+5:30
जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेची एन्ट्री होताच कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यात आली. शिवाय ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडही वाढविण्यात आले. कोविड रुग्णालयांवर वाढता ताण लक्षात घेता, केवळ गंभीर कोविड बाधितांनाच योग्य रेफर पद्धतीचा वापर करून कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आल्याने कोविड मृत्यू नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. असे असले तरी कोविडच्या दुसऱ्या लाट उच्चांकी गाठत असताना जिल्ह्यात रुग्णखाटांसह ऑक्सिजनचा तुटवडाच निर्माण झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट सुमारे चारपट नागरिकांवर परिणाम करणारीच ठरली. सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली, तरी कोविड उद्रेकाच्या काळात म्हणजेच कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात मृत्यू तांडव करीत असताना, २४ एप्रिल हा दिवस आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडविणाराच ठरला. यादिवशी तब्बल १८ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन रुग्णांना द्यावे लागले. तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेची एन्ट्री होताच कोविड रुग्णालयांच्या संख्येत वाढ करण्यात आली. शिवाय ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडही वाढविण्यात आले. कोविड रुग्णालयांवर वाढता ताण लक्षात घेता, केवळ गंभीर कोविड बाधितांनाच योग्य रेफर पद्धतीचा वापर करून कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यात आल्याने कोविड मृत्यू नियंत्रणात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. असे असले तरी कोविडच्या दुसऱ्या लाट उच्चांकी गाठत असताना जिल्ह्यात रुग्णखाटांसह ऑक्सिजनचा तुटवडाच निर्माण झाला होता. तर सध्या नवीन कोविडबाधित सापडण्याची गती मंदावल्याने कोविड रुग्णालयातील खाटा रिक्त आहेत. तर कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे.
मृत्यू तांडव बघून उडाली कोविड योद्धांची झोप
- कोविडची दुसरी लाट जिल्ह्यात मृत्यू तांडव करीत असताना, तसेच एकाचदिवशी १८ मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांना द्यावे लागत असल्याने प्रत्येक कोविड बाधिताला चांगली आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर तसेच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची झोपच उडाली होती.
जिल्ह्यात सध्या नवीन काेविडबाधित सापडण्याची गती मंदावली असली, तरी कोविड संकट कायम आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
- अर्चना मोरे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.
९३२ रुग्णांची पडली हाेती भर
- २४ एप्रिल यादिवशी १८ मेट्रिक टन ऑक्सिजन रुग्णांना द्यावे लागले; तर याचदिवशी तब्बल ९३२ नवीन रुग्णांची भर पडल्याने त्या दिवशी जिल्ह्याच्या रुग्णसंख्येने ३० हजार ६७७ चा आकडा पार केला.
- विशेष म्हणजे यादिवशी ३८ व्यक्तींचा कोविडने बळी घेतल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती; तर सध्या जिल्ह्याची कोविड परिस्थिती नियंत्रणात असून, जिल्ह्यात केवळ १५ ॲक्टिव्ह कोविडबाधित आहेत. असे असले तरी, कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.