जिल्ह्यात कलम १४४ लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:17+5:30
सदर आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र जमा होऊ नये. कोरोना वायरसच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भीती निर्माण करणारे मजकूर, व्हिडिओ आदी संदेश व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्यूटर,सोशल मिडिया व होर्डीग आदींच्या माध्यमातून प्रसारीत करु नये. तसेच अधिकृत माध्यमाव्दारे माहिती न घेता दिशाभुल करणारी माहिती प्रसार माध्यमावर प्रसारीत करु नये.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात कोरोना या विषाणुमुळे आरोग्य विषयक आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी मंगळवारी एक आदेश काढून मंगळवारपासूनच जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सिनेमागृहे, शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार, उत्सव, जत्रा, देवस्थाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. तसेच या कायाद्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये सभा, मेळावे, उपोषण, सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय, धार्मीक व क्रीडा विषयक कार्यक्रमांना ३१ मार्चपर्यंत सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
सदर आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र जमा होऊ नये. कोरोना वायरसच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भीती निर्माण करणारे मजकूर, व्हिडिओ आदी संदेश व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्यूटर,सोशल मिडिया व होर्डीग आदींच्या माध्यमातून प्रसारीत करु नये. तसेच अधिकृत माध्यमाव्दारे माहिती न घेता दिशाभुल करणारी माहिती प्रसार माध्यमावर प्रसारीत करु नये.
मिरवणुका, रॅली, सामुहिक कार्यक्रम, भाषणबाजी यांना प्रतिबंध करण्यात येत आहे. धार्मिक स्वरुपाचे समुपदेशन, धर्मपरिषद, धार्मिक गदीर्चे आयोजन करु नये, सदर आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू असणार आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय दंड संहिता १९७३ चे कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र ठरणार आहेत.
अधिकाऱ्यांना सूट
सदर प्रतिबंधात्मक आदेश कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पर्यवेक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना लागु असणार नाही. मात्र शासकिय कर्मचाऱ्यांना सुद्धा समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भीती निर्माण करणारे मजकुर व्हिडिओ व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्युटर, वृत्तपत्र, सोशल मिडिया व होर्डीग या माध्यमातून प्रसारित करता येणार नाही.
बसेस स्वच्छ केल्याशिवाय प्रवासासाठी पाठवू नये
सध्या राज्यात कोरोना संदर्भातील परिस्थीती पाहता जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगार व्यवस्थापकांना तसेच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांना बसेस दिवसातून दोनदा स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बसस्थानकावरील ध्वनीक्षेपकाव्दारे प्रवाशांना हात धूवूनच गाडीत बसण्याच्या सूचना देण्यासंदर्भात सांगितले आहे.