कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:13+5:30
कंत्राटी कामगार अंबर अशोक चव्हाण कंपनीच्या आदेशावरून मोटर पंपाची तक्रार निवारण्यासाठी आवीर्तील करीमनगर येथे गेला होता. कार्य करीत असतानाच विद्युत खांबा वरून खाली पडला. त्याला गंभीर इजा झाली. आर्वी उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, सावंगी आदी अनेक ठिकाणी त्याला उपचारार्थ दाखल केले. या घटनेची आर्वी पोलिसांत तक्रारही करण्यात आली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही.
राजेश सोळंकी।
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा (आर्वी) : वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्य करीत असताना वीजखांबावरून पडून अपंगत्व आलेल्या कर्मचाऱ्यांना, कंत्राटदार, वीज वितरण कंपनी किंवा शासनाने कोणतीही मदत केली नसल्याने कर्मचाºयांच्या कुटुंबाची वाताहत होत असल्याचे चित्र आहे. पोलिसही या घटनेची दखल घ्यायला तयार नाहीत.
कंत्राटी कामगार अंबर अशोक चव्हाण कंपनीच्या आदेशावरून मोटर पंपाची तक्रार निवारण्यासाठी आवीर्तील करीमनगर येथे गेला होता. कार्य करीत असतानाच विद्युत खांबा वरून खाली पडला. त्याला गंभीर इजा झाली. आर्वी उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, सावंगी आदी अनेक ठिकाणी त्याला उपचारार्थ दाखल केले. या घटनेची आर्वी पोलिसांत तक्रारही करण्यात आली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. कंत्राटदाराने कुठल्याही प्रकारची मदत केली नाही. एवढेच नव्हे, तर वीज वितरण कंपनी किंवा शासनानेही मदतीचा हात पुढे केला नाही. अंबर चव्हाण यांचा वीजखांबावरून पडल्याने पाठीचा मणका दबला असून त्याला व्यवस्थित चालता येत नाही आणि बसताही येत नाही. २७ डिसेंबर २०१८ ला मंगेश शिरभाते हा कंत्राटी कामगार द्रुगवाडा (आष्टी) येथील डीपीवर काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसल्याने तो खाली कोसळला. लगेचच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा हात कापावा लागला व तो कायमचा अपंग झाला. या घटनेची तक्रार ते देण्यास गेले असता पोलिसांनी थोडीही माणुसकी दाखवली नाही. त्याची तक्रार नोंदविली नाही. हे कुटुंबही प्रचंड हालअपेष्टा सहन करीत आहे.
२०१६ मध्ये कंत्राटी कामगार राजेश मोहोड हा आर्वी तालुक्यातील टाकरखेडा येथे वीजखांबावर काम करीत असतानाच त्याचा अपघात झाला व तो मृत्युमुखी पडला. त्याच्या कुटुंबाला अनेक नेत्यांच्या दारी, अधिकाºयांचे उंबरठे झिजवावे लागले. त्यानंतरच थोड्याफार प्रमाणात त्यांना मदत मिळाली. दहा ते पंधरा वर्षांपासून वीज वितरण कंपनीने सर्व कामे कंत्राटदारामार्फत करून घ्यायचा सपाटा लावला. त्यामुळे विद्युत क्षेत्रात काम करणाºया असंख्य कंत्राटी कामगारांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. त्यांचे महावितरणमध्ये समायोजन केले नाही किंवा माथाडी कामगार बोर्डाच्या धरतीवर शासन त्यांना जगण्यात आधारही देत नसल्याची शोकांतिका आहे. अनेक महिने कंत्राटदार त्यांना वेतन देत नाही. त्यामुळे कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, एखादी आकस्मिक घटना घडून अपंगत्व आले तर काय करावे, अशा भीतीच्या छत्रछायेत हे कंत्राटी कामगार जीवन कुंठत आहेत.
११६ कंत्राटी कामगारांच्या कुटुंबांचा प्रश्न
आर्वी विभागीय क्षेत्रात आउटसोर्सिंग टेक्निशियन म्हणून ११६ कंत्राटी कामगार आहेत. हे कंत्राटी कामगार कुठल्याही मोबदल्याविना कंत्राटदार किंवा वीज वितरण कंपनीचे स्वाधीन आपला जीव करतात. नियमित कर्मचाºयांप्रमाणे खांबावर चढून सर्व कामे करतात. रात्री-बेरात्री ब्रेक डाऊनसाठी उपस्थित राहतात . कंपनीने कोणतीही तक्रार दिली तर त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, कर्मचाºयांना अपघात झाला तर साधी आरोग्याची मदतही कंत्राटदार किंवा वीज वितरणची मिळत नाही. त्यामुळे अनेक कंत्राटी कामगारांना अपंगत्व आल्याने ते हाल-अपेष्टा सहन करीत आहे. कुटुंबास त्रास सहन करावा लागत आहे.