सुरक्षा रक्षकांना गुंगीचे औषध देत दानपेटी फोडली
By admin | Published: July 7, 2015 01:37 AM2015-07-07T01:37:02+5:302015-07-07T01:37:02+5:30
येथील टेकडीवर असलेल्या दर्ग्यातील सुरक्षा रक्षकांना शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन दानपेटी पळविल्याची खळबळजनका घटना सोमवारी सकाळी उघड झाली.
गिरड टेकडीवरील घटना: दीड लाख रुपये पळविले
गिरड : येथील टेकडीवर असलेल्या दर्ग्यातील सुरक्षा रक्षकांना शीतपेयामध्ये गुंगीचे औषध देऊन दानपेटी पळविल्याची खळबळजनका घटना सोमवारी सकाळी उघड झाली. या दानपेटीत समारे दीड लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी दर्ग्याच्या सुरक्षेत तैनात सीसीटिव्ही कॅमेरे व सेट टॉप बॉक्सही पळविला.
या प्रकरणाची तक्रार गिरड ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपासाची सुत्रे फिरविली जात असून जाम, उमरेड व चिमूर मार्गावर नाकाबंदी केली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू आहे. मात्र पोलिसांना अद्याप काहीच गवसले नाही.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तीन अज्ञात इसम दर्ग्याच्या टेकडीवर आले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना मार्ग हरवलो असून रात्रभराकरिता येथे विश्राम करावयाचा आहे, अशी विनंती केली. सुरक्षा रक्षकांनी ही विनंती मान्य करून रात्रभर मुक्काम करण्याची परवानगी दिली. दरम्यान, दर्ग्याचे पुजारी सैय्यद अयुब हे देखील आले. या तीन अज्ञात इसमांनी सगळ्यांना शीतपेय पिण्यासाठी दिले. शीतपेय पिताच सहाही जण गाढ झोपेत गेले. याचाच फायदा घेत चोरट्यांनी सैय्यद अयुब याच्यांकडील दानपेटीची चाबी घेवून दानपेटी उघडली. त्यातील अंदाजे एक लाख ४० हजार रुपये तसेच सिसीटिव्ही कॅमेरे घेवून पळ काढला.
पहाटे ४ वाजताच्या सुमारास जाग आली असता त्यांना दानपेटी उघडी दिसली. त्यातील रोख लंपास होती. घटनेची माहिती त्यांनी गिरड पोलिसांना दिली. ठाणेदारासह पोलीस ताफा घटनास्थळावर दाखल झाला. घटनास्थळाची पाहणी केली असता सिसी टिव्ही कॅमेरे व सेट टॉप बॉक्सही लंपास केल्याचे पाहणीत दिसून आले.
तपासाची सुत्रे फिरवत जाम, उमरेड, चिमूर या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. सदर तीन अज्ञात इसम स्कॉर्पिओ गाडीने आल्याची माहिती असून त्या दिशेने तपास सुरू आहे. दर्गाह कमिटीचे चेअरमेन करिमुद्दीन काजी यांनी घटनेची तक्रार गिरड पोलिसात दिली असून याप्रकरणी कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.(वार्ताहर)