अप्रशिक्षित वाहनचालकांमुळे सुरक्षा धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2015 01:59 AM2015-06-04T01:59:48+5:302015-06-04T01:59:48+5:30
ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो.
परवाना नसतानाही मुलांकडे वाहने : पालकांचे दुर्लक्ष, पोलीसही असतात पैशाच्या शोधात
वर्धा : ग्रामीण रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात. त्यात ९० टक्के वाहन चालकांजवळ परवानाच नसतो. परिणामी ग्रामीण भागात घडणाऱ्या अपघातांची पोलीस दप्तरी नोंद न होता असे प्रकरण मिटविले जाते. या वाहन चालकांमुळे सुरक्षीतता धोक्यात आली असून उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांचे केवळ शहराकडे लक्ष असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात आता प्रत्येक घरी दुचाकी आली. कुटुंबातील लहानात लहान मुलगा पालकांकडे वाहन चालविण्यासाठी हट्ट धरतो. त्याचा हट्ट पुरविण्यासाठी अनेक पालक मुलांच्या हातात दुचाकीची चावी देतात. यातून अनेकदा अपघात घडतात.
पाचव्या वर्गात शिकणारा मुलगाही गावातून ‘फ्लॅश’ मारत सुसाट वेगाने दुचाकीने जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येते. सोबत आपल्या अप्रशिक्षित मित्रालाही गावातून, शाळेसमोरून जाण्यासाठी वाहन चालविण्यास सहकार्य करीत असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे.
ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आले आहेत. त्यापैकी बहुतांश चालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो. तरीही ते भरधाव वेगाने वाहन चालवितात. त्यात किरकोळ व गंभीर अपघात नेहमीच कुठे न कुठे घडतात. मात्र कायद्याच्या कचाट्यातून सुटण्याकरिता जखमींना खासगी दवाखान्यात दाखल करून वाहन मालक-चालक जागीच तडजोड करून सुटका करवून घेतात. त्यामुळे पोलीस ठाण्यात त्या अपघाताची नोंदच होत नाही.
ग्रामीण भागात आता प्रत्येकाकडे दुचाकी आली. मात्र परवाना प्रत्येकाकडे नसतो. तरीही रस्त्याने वेडी-वाकडी वळणे घेत भरधाव वेगाने दुचाकी चालविली जाते. परिणामी अनेकदा अपघात घडतात. कधी सुसाट वेगाने जाणारेच एखाद्या अपघातात आपला जीवही गमावतात. या अप्रशिक्षित दुचाकीस्वारांमुळे जनावरेही जखमी होण्याच्या घटना वाढत आहेत. शाळकरी मुले, वृद्ध व पादचाऱ्यांचे जीव धोक्यात आले आहे. ग्रामीण रस्ते आता असुरक्षित बनले आहे. मात्र तरीही चालक परवाना तपासणीचे काम ग्रामीण भागात होत नाही.
ग्रामीण भागातील काही ठिकाणी आठवडी बाजाराच्या दिवशी संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी वसुलीपुरते फाट्यावर उभे राहून वाहन चालकांना अडवितात. त्यांच्याकडून पैसे वसूल करून सोडून दिले जाते. त्यामुळे अनेक अल्पवयीन मुले पोलिसांनाही न घाबरता पैसे देऊन आपली सुटका करवून घेतात. पोलिसांचा वाहतूक विभाग सांभाळतो. ग्रामीण भागात मात्र वाऱ्यावरच असतो. त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)