सावंगीसह सेवाग्रामात कोविड युनिटची सुरक्षा टाईटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 05:00 AM2021-03-27T05:00:00+5:302021-03-26T23:30:17+5:30
वर्धा जिल्ह्यातील या दोन्ही कोविड रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णाशिवाय कुणालाही या कोविड युनिट मध्ये प्रवेश दिला जात नाही. रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या रुग्णाला तालुका स्तरावरील रुग्णालयात दाखल केले जाते. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णाला तेथून शासकीय व नेमूण दिलेल्या रुग्णवाहिकेतून संबंधित कोविड रुग्णालयात पाठविले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा १७ हजाराच्या वर पोहचला आहे. कोरोनाची एन्ट्री होताच जिल्हा प्रशासनाने सावंगी येथील आचार्य विनोबा भावे तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केले. या दोन्ही ठिकाणी वर्ष भरापासून कोविड युनिट आहे. या दोन्ही ठिकाणच्या सुरक्षेबाबत लोकमतने रिॲलिटी चेक केला असता सुरक्षा अतिशय चोख असल्याचे दिसून आले.
वर्धा जिल्ह्यातील या दोन्ही कोविड रुग्णालयात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णाशिवाय कुणालाही या कोविड युनिट मध्ये प्रवेश दिला जात नाही. रुग्ण आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या रुग्णाला तालुका स्तरावरील रुग्णालयात दाखल केले जाते. प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णाला तेथून शासकीय व नेमूण दिलेल्या रुग्णवाहिकेतून संबंधित कोविड रुग्णालयात पाठविले जाते. त्यावेळी रुग्ण व आरोग्य कर्मचारीच सोबत असतो. रुग्णालयातही त्याला दाखल केल्यानंतर कुणालाही येथे प्रवेश दिला जात नाही. जिल्हा प्रशासनाने रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या संपर्कासाठी कंट्रोल रूम तयार केली असून या रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचे क्रमांक तेथे नमूद करण्यात आले आहे. भ्रमणध्वनीवरून रुग्णाची माहिती नातेवाईक त्यांच्याकडून घेवू शकतात. याव्यतिरिक्त कुणालाही तेथे प्रवेश नाहीच.
तज्ञ डॅाक्टरसह कर्मचारी उपस्थित
कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे जुन्या इमारतीच्या मागील बाजूस कोविड युनिट सेंटरची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे पुरेसे कर्मचारी व डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना वेळोवेळी माहिती दिली जाते.
कोविड केंद्र परिसरात सुरक्षेचे कवच
सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात कोविड युनिट सुरू करण्यात आले आहे. येथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. कुणालाही प्रवेश दिला जात नाही. बाहेरच सुरक्षा रक्षक नागरिक व नातेवाईकांना थांबवितात.
सध्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या नातेवाईकांना संपर्काकरिता जिल्ह्यातील तीन रुग्णालयाच्या कंट्रोल रूमचे क्रमांक देण्यात आले आहे. येथील नोडल अधिकारी यांचेही संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे.
- डॅा. सचिन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, वर्धा.