वृक्ष लागवडीकरिता ‘रोपे आपल्या दारी’ उपक्रम
By admin | Published: June 24, 2017 12:54 AM2017-06-24T00:54:00+5:302017-06-24T00:54:00+5:30
शहरीकरणाच्या सपाट्यात झाडाची संख्या रोडावत असून त्याचा वातावरणावरही परिणाम होत आहे.
११ दिवसीय कार्यक्रम : वनविभागाने टाकले एक पाऊल पुढे
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरीकरणाच्या सपाट्यात झाडाची संख्या रोडावत असून त्याचा वातावरणावरही परिणाम होत आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व ओळखून वनविभागाने एक पाऊल पुढे टाकत ‘रोपे आपल्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. २५ जून ते ५ जुलै दरम्यान हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे वनविभागाच्यावतीने सांगण्यात आले.
शासनाचे विविध विभाग व जनतेच्या सहभागातून २०१६ मध्ये पावसाळ्यात वनमहोत्सव कालावधीत एकाच दिवसीय उपक्रम राबवून २ कोटी ८१ लाख वृक्ष लावले होते. तर २०१७ मध्ये ४ कोटी वृक्ष लागवड, २०१८ मध्ये १३ कोटी व २०१९ मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवड याप्रमाणे ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात वनविभागासाठी ३ लाख ७८ हजार, सामाजिक वनीकरण १ लाख २५ हजार, ग्राम पंचायतीकरिता १ लाख १० हजार व स्वयंसेवी संस्था ३९ हजार असे ९ लाख २ हजार रोपे लागवडीचे उदिष्ट देण्यात आले आहे. १ ते ७ जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवून हा उपक्रम यशस्वी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी व कारंजा या पाच ठिकाणी रोपे पुरविण्याकरिता वनविभागाकडून वनमहोत्सव केंद्र सुरू करण्यात आली आहेत. सदर ठिकाणी वृक्ष मित्राची सुद्धा निवड करण्यात आली आहे. वनमहोत्सव केंद्रावरील रोपे नागरिकांना रोपे आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान प्रत्येक घराकरिता जास्तीत जास्त ५ व प्रत्येक गृहनिर्माण संस्था इतर संस्था जास्तीत जास्त २५ रोपे शासनाकडून वनमहोत्सव कालावधीत ठरविलेल्या सवलतीच्या दरानुसार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रोपांचा पुरवठा वनमहोत्सव केंद्रात रोपे शिल्लक असे पर्यंत केला जाणार आहे. प्रथम येणाऱ्यांना प्रधान्यक्रम देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
वनमहोत्सवादरम्यान रोपे प्राप्त करण्याकरिता वर्धा शहरात आर्वी नाका वन कर्मचारी भास्कर इंगळे, वृक्षमित्र अजिक्य काळे, शिवाजी चौकात अरुण कांडलकर, अभिषेक गुजर, बस स्थानकाजवळ विलास पोहेकर, सुमीत जैन, हिंगणघाट नंदोरी चौकात भोवते, न्यायालयासमोर कोपुलवार, आर्वी वनक्षेत्र कार्यालयात वानखेडे, अर्थव मोहदेकर, शेळके, आकाश ठाकरे, कारंजा बस स्थानकासमोर ज्योती लंगडे, वृक्षमित्र संजय तांडेकर यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन उप वनसंरक्षक दिगांबर पगार केले आहे.
वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण ही काळाची गरज असून वनविभागाच्या उपक्रमात मोठ्या संख्येने वयोवृद्धसह तरुण-तरुणी तसेच विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही उप वनसंरक्षक पगार यांनी केले आहे.