गोंधळ पाहून सभापतीही झाल्या अवाक्
By admin | Published: September 18, 2016 12:56 AM2016-09-18T00:56:42+5:302016-09-18T00:56:42+5:30
जि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे यांनी दोन जि.प. सदस्यांसह अंगणवाड्यांची तपासणी केली.
अंगणवाडीमधील प्रकार : अचानक दिलेल्या भेटीत भोंगळ कारभार उघड
रोहणा : जि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे यांनी दोन जि.प. सदस्यांसह अंगणवाड्यांची तपासणी केली. शुक्रवारी अचानक अंगणवाड्यांना भेट दिली तेव्हा तेथील गोंधळ पाहून सर्व अवाक् झाले. अंगणवाडी सेविका जि.प. सभापतींना ओळखत नसल्याचे निदर्शनास आले, हे विशेष! एका अंगणवाडीत तर फलकावर लिहिलेली तारीखही जुनीच असल्याचे आढळले.
जि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे येथील जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे व कारंजा तालुक्यातील जि.प. सदस्य सारिका खवशी, असे तिघे शासकीय वाहनाने दिघी (होणाडे) गावालगत सायखेडा पुनर्वसन येथील अंगणवाडीत दुपारी पोहोचले. यावेळी विद्यार्थी होते. अंगणवाडी सेविकाही होती; पण सुविधांचा अभाव होता. सभापतींनी अंगणवाडी सेविकेला नमस्कार केला. ओळखले का मला, असा प्रश्न करताच अंगणवाडी सेविकेने ‘हो तुम्हाला ओळखले, तुम्ही तृप्तीताई पावडे आहात’, असे उत्तर दिले. या उत्तराने सर्वांनाच धक्का बसला. कदाचित अंगणवाडी सेविकेला सभापती माहित नसेल म्हणून असे झाले, असे म्हणत या प्रकरणावर पडदा पडला; पण सभापतींना अंगणवाडी सेविका ओळखत नाही, हे उघड झाले. येथील अंगणवाडीत ९ वर्षांपूर्वीची पाणी पुरवठा समितीची यादी आढळली. चौकशीत ग्रामसेवकांनी ती उपलब्ध करून दिली नसल्याचे सांगितले.
पाहणी केल्यानंतर मोर्चा रोहणा अंगणवाडीकडे वळला. यावेळी तेथे अंगणवाडी सेविका हजर होती तर मदतनिस गत दहा दिवसांपासून आलीच नसल्याचे समजले. याबाबत तक्रारही केल्याचे अंगणवाडी सेविका सांगत होत्या. फलकावर लिहिलेली तारीख पाहून सभापतींनी आजची तारीख विचारली असता तारीख लिहिण्याची आठवण राहिली नाही, असे सांगितले. तिसऱ्या अंगणवाडीला भेट दिली असता ती बंद होती. एका शिक्षिकेला विचारले असता माझी अंगणवाडी दुसरी आहे, असे उत्तर दिले. दिघीच्या अंगणवाडीची पाहणी केली असता भोंगळ कारभार समोर आला. यामुळे अंगणवाड्या किती सुसज्ज हे समोर आले.(वार्ताहर)
एकही अंगणवाडी व्यवस्थित नसल्याचे वास्तव
जि.प. महिला बालकल्याण सभापती चेतना मानमोडे, जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे, सारिका खवशी यांनी शुक्रवारी रोहणा परिसरातील अंगणवाड्यांना भेटी देत पाहणी केली. या पाहणीमध्ये विदारक सत्य बाहेर आहे. परिसरातील एकही अंगणवाडी व्यवस्थित नव्हती. काही अंगणवाडी सेविका तर सभापतींनाही ओळखत नसल्याचे समोर आले. या प्रकारामुळे अंगणवाड्यांची घडी व्यवस्थित बसवावी लागणार असल्याचे मतही पाहणी केल्यानंतर मान्यवरांनी व्यक्त केले.