निकृष्ट काम पाहून उपसभापतीही अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 11:40 PM2018-05-10T23:40:00+5:302018-05-10T23:40:00+5:30
येथील दवाखान्याच्या इमारतीला लोकार्पण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेलेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सेलू पं.स.च्या उपसभापती सुनीता अडसड यांनी बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांना धक्काच बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली : येथील दवाखान्याच्या इमारतीला लोकार्पण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेलेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सेलू पं.स.च्या उपसभापती सुनीता अडसड यांनी बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
गावातील आयुर्वेदिक दवाखाना इमारत बांधकामासाठी तथा संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी ३० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. इमारतीचे काम दर्जेदार होणे अपेक्षित होते; पण निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न प्रत्येक स्तरावर होत आहे. येथील शाखा अभियंता खरवडे यांनी कधीही कामाची पाहणी केली नाही. जागेवर बसून कंत्राटदारांच्या मर्जीप्रमाणे कामाचे मूल्यांकन करून दिले व त्याआधारे ग्रामसेवकाने बिल अदा केले.
कामाच्या दर्जाकडे ग्रामसेवक व शाखा अभियंत्याने कधीही लक्ष दिले नाही. यामुळे सदर इमारत धोकादायक झाली आहे. इमारतीचा पाया जमिनीपासून विलग झाला असून जागोजागी इमारतीला तडे गेले आहेत. दवाखान्यात लावलेल्या टाईल्सही उखडल्याचे उपसभापती अडसड यांच्या पाहणीत आढळून आले. कामाचा दर्जा पाहून उपसभापतींनी संताप व्यक्त केला. या बांधकामाची सखोल चौकशी करावी. दोषी कंत्राटदार, अधिकाºयांवर त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी बीडीओला दिलेत.
संगनमत करून लाटला निधी
शाखा अभियंता, कंत्राटदार तथा तत्कालीन ग्रामसेवकाने संगणमत करून इमारत बांधकामातील निधी लाटल्याचा आरोप ग्रा.पं. सदस्य रजनी दखणे, रमेश काकडे, अमोल अनकर यांनी केला आहे.
काम अपूर्ण असताना कंत्राटदाराला संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली होती. शेवटी कंत्राटदारांची मनधरणी करून काल-परवापासून विद्युत फिटींगचे काम सुरू करण्यात आले, ही आश्चर्याचीच बाब आहे.
‘लोकमत’ने प्रकाशित केलेले वृत्त खरे आहे. मी स्वत: इमारत बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यात इमारत दबते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. याबाबत गटविकास अधिकाºयांना चौकशीचे आदेश दिले असून मासिक सभेत हा विषय चर्चिला जाणार आहे.
- सुनीता अडसड, उपसभापती, पं.स. सेलू.