क्रीडा संकुल पाहून जिल्हाधिकाऱ्यांचा संताप

By Admin | Published: December 2, 2015 02:15 AM2015-12-02T02:15:49+5:302015-12-02T02:15:49+5:30

क्रीडा प्रशासनाची उदासीनता व अधिकाऱ्याच्या कामचुकार वृत्तीमुळे तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. बिलाचा भरणा न केल्याने पाच महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे.

Seeing the sports complex, the District Collector's anger | क्रीडा संकुल पाहून जिल्हाधिकाऱ्यांचा संताप

क्रीडा संकुल पाहून जिल्हाधिकाऱ्यांचा संताप

googlenewsNext

क्रीडा संकुलाची दुरवस्था : पाच महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित
देवळी : क्रीडा प्रशासनाची उदासीनता व अधिकाऱ्याच्या कामचुकार वृत्तीमुळे तालुका क्रीडा संकुलाची दुरवस्था झाली आहे. बिलाचा भरणा न केल्याने पाच महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे. पिण्याचे पाणी नाही, सर्वत्र अस्वच्छता आहे. ‘इन डोअर’ व ‘आऊट डोअर’ खेळांचे साहित्य नसल्याने खेळाडूंमध्ये रोष आहे. याची दखल घेत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी क्रीडा संकूलाला भेट देत पाहणी केली. क्रीडा संकूलाची दुरवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.
याप्रसंगी संबंधित क्रीडा अधिकाऱ्याला सलील यांनी धारेवर धरले. आठ दिवसांत संकुलाच्या दुरूस्तीसह खेळाडूंना सर्व साहित्य व सुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या समवेत पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, तहसीलदार तेजस्विनी जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी ओमकांता रंगारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागोच अधिकारी उपस्थित होते.
स्थानिक न.प. ले-आऊट येथे अडीच एकर परिसरात दीड कोटी रुपये खर्च करून क्रीडा संकूलाची निर्मिती करण्यात आली; पण येथे इनडोअर व आऊटडोअर या दोन्ही खेळांचे साहित्य उपलब्ध नाही. यामुळे संकूल शोभेचे ठरत आहे. गत दोन वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. या संकूलामध्ये रनिंग ट्रॅकची तसेच कबड्डी व व्हॉलीबॉलच्या मैदानाची व्यवस्था नाही. थ्री फेजचे मीटर नसल्याने ‘फ्लड लाईट’सह अन्य सुविधांचा अभाव आहे. नवनिर्मित वास्तूमध्ये अंतर्गत ड्रेनेजसह अनेक त्रुट्या आहेत. बंदद्वार स्टोअरची व्यवस्था नसल्याने खेळाचे साहित्य कुठे ठेवावे, हा प्रश्नच आहे.

ध्वजारोहणालाही बगल
राष्ट्रीय सण असलेल्या स्वातंत्र्य दिन, गणराज्य दिनी येथील क्रीडा संकूलावर ध्वजारोहणही केले जात नसल्याचे जिल्हाधिकारी सलील यांना सांगण्यात आले. हा प्रकार ऐकून जिल्हाधिकारीही अवाक् झाले. यात सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: Seeing the sports complex, the District Collector's anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.