सीबीआय चौकशी मागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 10:41 PM2018-04-19T22:41:20+5:302018-04-19T22:41:20+5:30
सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके प्रकरण गंभीर असून पोलिसांचा या प्रकरणातील हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी म्हणून सदर प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची शिफारस आयोगामार्फत करणार आहे,.....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील शुभांगी उईके प्रकरण गंभीर असून पोलिसांचा या प्रकरणातील हलगर्जीपणा उघड झाला आहे. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी म्हणून सदर प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्याची शिफारस आयोगामार्फत करणार आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., संशोधन अधिकारी वाय.के. बन्सल, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दिगंबर चव्हाण उपस्थित होते.
तरूण मुलींबाबत पोलिसांची असंवेदनशीलता यात प्रकर्षाने दिसून येते. सद्यस्थितीत दुर्लक्ष केलेल्या बाबींची आणि पुराव्यांची पोलिसांनी सखोल चौकशी करून त्याचा अहवाल आयोगाला सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. मुलीच्या आई-वडिलांना साह्य व्हावे म्हणून आदिवासी विभागाकडून त्वरित ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी. मनोधैर्य योजनेतून या प्रकरणी आर्थिक सहकार्य करावे. भूमिहिन असलेल्या मुलीच्या आई-वडिलांना दादासाहेब गायकवाड स्वाभिमान सबलीकरण योजनेचा लाभ द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांनी घटनेच्या तपासाबद्दल संपूर्ण माहिती दिली. याप्रकरणी तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचेही सांगितले. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यापूढे यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, अशी हमी दिली.
जिल्हाधिकारी नवाल यांनी या प्रकरणी प्रशासन अतिशय संवेदनशील असून प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वस्त केले. यावेळी मयत मुलीची आई उपस्थित होती.
शुभांगीच्या घरी भेट देत केली चौकशी
गुरूवारी सकाळी आयोगाच्या सदस्य माया इवनाते यांनी मयत शुभांगी उईके हिच्या घरी भेट देऊन चौकशी केली. यावेळी शुभांगी उईके हिच्या मामांनी संपूर्ण माहिती दिली. बैठकीमध्ये शुभांगीच्या आईने मुलीची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.