जप्त वाळूची पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:15 AM2019-06-12T00:15:00+5:302019-06-12T00:15:20+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्हा खनिकर्म विभाग व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई करीत ७० साठ्यावरुन ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. अंदाजाने जप्तीत दाखविलेला व प्रत्यक्ष वाळूसाठा यात तफावत आहे. याचाच फायदा उचलत वाळू माफियांनी चंदेरी अंधारात जप्त केलेल्या साठ्यावरुन वाळूची पळवापळवी सुरु केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्हा खनिकर्म विभाग व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई करीत ७० साठ्यावरुन ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. अंदाजाने जप्तीत दाखविलेला व प्रत्यक्ष वाळूसाठा यात तफावत आहे. याचाच फायदा उचलत वाळू माफियांनी चंदेरी अंधारात जप्त केलेल्या साठ्यावरुन वाळूची पळवापळवी सुरु केली आहे.
घाटबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करुन साठेबाजी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारत ८० साठ्यावर कारवाई करण्यात आली. यातील ७० साठेबाजांना नोटीस बजावत बुधवारपर्यंत उत्तर मागविले आहे; पण मंगळवारी उशिरापर्यंत बोटावर मोजण्या इतक्यांनीच उत्तर सादर केल्याची माहिती आहे. शुक्रवारी झालेल्या या कारवाईत सर्वाधिक वाळूसाठा सोलोड येथून जप्त करण्यात आला. त्या पाठोपाठ सिंदी (मेघे), पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), भुगाव, कारला, म्हसाळा, उमरी (मेघे) व नालवाडी या भागातूनही वाळू जप्त केली. कारवाईनंतर अनेक साठेबाजांनी रात्रीतून साठ्यावरील वाळू उचलण्यास सुरुवात केली आहे. म्हसाळा आणि महाकाळ-सुरगाव मार्गावरील शेतातील मोठा वाळूसाठा रात्रीतून अर्धाअधिक लंपास करण्यात आला. तसाच प्रकार इतरही ठिकाणी सुरु असून जप्त वाळूची पळवापळवी सुरू झाली आहे. त्यामुळे महसुल विभाग पुन्हा नव्याने सर्च मोहीम राबवून ते साठेही जप्त करणार काय? शिवाय वाळू माफीयांना अभय देणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सालोडमध्ये दोन हजार ब्रासच्यावर वाळूसाठा?
सालोड परिसरातून उत्खनन माफिया होमेश ठमेकर यांच्या मालकीच्या जागेवरुन १,२०० ब्रास वाळू जप्त करण्यात आली; पण त्या ठिकाणी २ हजारच्यावर वाळू साठा असल्याचे दिसून येते. कारवाई नंतर काळोखाचा फायदा घेत वाळूची विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे उत्खनन माफिया ठमेकर पळवाटीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या गोड संबंधाचा वापर तर करून घेणार नाही ना, अशी चर्चा वाळू माफियांमध्ये होत आहे.
जिल्ह्यातील साठ्यांवरही होणार कारवाई
वर्धा शहरासह आजुबाजुच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू साठे असल्याची तक्रार प्राप्त झाल्याने कारवाईला सुरुवात करण्यात आली. शहरातील वाळूसाठे जप्त करीत त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या तक्रारी जिल्ह्यातील इतर ठिकाणाहूनही प्राप्त झाल्यास तेथेही कारवाई केली जाईल. त्यासाठी विशेष पथक तयार केल्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी सांगितले.
शहरालगतच्या परिसरातील ७० च्यावर वाळूसाठे जप्त करण्यात आले आहे. जप्ती करताना जितक्या ब्रासची नोंद करण्यात आली. तेवढ्या वाळूचा दंड साठेबाजाकडून वसूल केल्या जाईल. तसेच तेवढ्याच साठ्याचा लिलावही होईल. या जप्त साठ्यातून जर वाळूची उचल होत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- प्रिती डुडुलकर, तहसीलदार.