कामधेनू दत्तकग्रामसाठी चार गावांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 09:54 PM2018-08-19T21:54:58+5:302018-08-19T21:58:18+5:30

शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून विविध योजना शासन राबविते. त्याचाच एक भाग म्हणून कामधेनू दत्तकग्राम योजना राबविली जाते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने यंदाच्यावर्षी चार गावांची निवड करून तेथे कामधेनू दत्तकग्राम योजना एकूण दहा टप्प्यात राबविली जाणार आहे.

Selection of four villages for Kamdhenu Dattakagram | कामधेनू दत्तकग्रामसाठी चार गावांची निवड

कामधेनू दत्तकग्रामसाठी चार गावांची निवड

Next
ठळक मुद्देदहा टप्प्यात अंमलबजावणी : दुग्ध व्यवसायाला चालना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतीला पुरक व्यवसायाची जोड म्हणून विविध योजना शासन राबविते. त्याचाच एक भाग म्हणून कामधेनू दत्तकग्राम योजना राबविली जाते. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने यंदाच्यावर्षी चार गावांची निवड करून तेथे कामधेनू दत्तकग्राम योजना एकूण दहा टप्प्यात राबविली जाणार आहे.
देशातील ग्रामीण जनतेचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीसोबतच पशुसंवर्धन या पुरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळणे ही काळाची गरज आहे. पशुसंवर्धनामधील दुग्ध व्यवसाय, शेळीपालन व कुकुटपालन हे तीन प्रमुख व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारेच आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धनाच्या विकासाला वाव निर्माण झाला आहे. सोबतच वर्धा जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत मदर डेअरीच्या माध्यमातून दुधाला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी व पशुपालकांचा पशुसंवर्धनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलला आहे. पशुपालक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा पशुसंवर्धनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अनेक उपक्रम हाती घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून जि.प. पशुसंवर्धन विभागाकडून कामधेनू दत्तकग्राम योजना गत पाच वर्षांपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना आतापर्यंत या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी कामधेनू दत्तकग्राम योजनेसाठी चार गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात आर्वी तालुक्यातील गौरखेडा, चोरांबा, काकडधरा ही ३ गावे मिळून एक दत्तकग्राम, आष्टी तालुक्यातील वाघोली, नरसापूर ही दोन गावे मिळून एक दत्तकग्राम, कारंजा (घा.) तालुक्यातील सारवाडी मध्ये एक दत्तकग्राम आणि जसापूर, किन्हाळा ही दोन गावे मिळून एक दत्तकग्राम तयार करण्यात आले आहे. या योजनेची अंमलबजावणी सदर गावांमध्ये एकूण दहा टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात आले. सदर योजना पशुपालकांसाठी फाद्याची ठरणारीच आहे.
विविध उपक्रम राबविणार
ज्या गावांची निवड कामधेनू दत्तकग्रामसाठी करण्यात आली आहे तेथे पशुपालक मंडळ स्थापन करणे, अभ्यास सहलीचे आयोजन करणे, जंतनाशक शिबिराचे आयोजन, खनिजद्रव्ये मिश्रण व जिवनसत्वांचा पुरवठा करणे, गोचिड, गोमाशी निर्मूलन शिबिराचे आयोजन, वंधत्व निदान व उपचार शिबिराचे आयोजन, वैरण विकास कार्यक्रम राबविण्यासाठी वैरण बियाणे वितरण करणे, निकृष्ट चारा सकस करणे, नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे, जनावरांचे मलमूत्र व वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन करणे आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

योजना सफल करण्यासाठी आणि पशुसंवर्धनाचे माध्यमातून आर्थिक विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सदर गावातील पशुपालकांनी नजीकच्या पशु वैद्यकीय दवाखान्याशी तसेच पशुधन विकास अधिकारी पं.स. आर्वी, आष्टी, कारंजा यांच्याशी संपर्क करावा.
- डॉ. प्रज्ञा गुल्हाणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि प. वर्धा.

Web Title: Selection of four villages for Kamdhenu Dattakagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.