वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग; २४ तास विजेच्या केवळ भूलथापा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:30 PM2024-11-05T17:30:20+5:302024-11-05T17:31:57+5:30
Vardha : शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : महावितरणच्यावतीने २४ तास वीजपुरवठा पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गावात गेल्या काही दिवसांपासून विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. गावात लोडशेडिंग नसताना तासन् तास वीजपुरवठा बंद राहत असून, पुरवठा सुरळीत कधी होणार, याची माहितीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले आहे. याचा फटका पिकांना फटका बसत असून, शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
येथील महावितरण विद्युत केंद्र अभियंता कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. सध्या दीपावली उत्सव चालू आहे. मात्र, अभियंत्याच्या कामचुकारपणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
रब्बी पिकांची पेरणी शेतशिवारात अंतिम टप्प्यात असून, पिकाला पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, लोडशेडिंगमुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आलेल्या नुकसानाची भर रब्बीत भरून काढू, या आशेवर शेतकरी कामाला लागला होता. मात्र, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग केले आहे. त्यात दिवसा वीजपुरवठा खंडित आणि रात्री वीज सुरू, असा प्रकार केवळ वायगाव पुरताच मर्यादित आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. जंगली जनावरांच्या दहशतीत शेतकरी ओलीत करीत असल्याचे चित्र परिसरात दिसून आले आहे.
शेतकऱ्यांनी या संदर्भात विचारणा केली असता पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नसल्याने लोडशेडिंग करावे लागत असल्याचे बोलले जाते. मात्र, यावर स्थानिक प्रतिनिधी यावर गप्प का, असा प्रश्न वायगाव (नि.) ग्रामस्थांना पडला आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सहा वर्षांपासून समस्या कायम
वीजवाहिनीवर लोड वाढल्याने पुरवठा खंडित होते. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. ही समस्या सहा वर्षांपासून आहे. हेच कारण प्रत्येक वेळी समोर केले जाते. यावर आतापर्यंत उपाययोजना का झाल्या नाही, असा प्रश्न पडला आहे.
"कुठल्याही ठिकाणी लोडशेडिंग नाही. मात्र, वायगाव (नि.) येथेच का लोडशेडिंग देण्यात येते. हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासूनचा आहे. मात्र, या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधीही काही बोलायला तयार नाही. दिवसा लोडशेडिंग आणि रात्री वीजपुरवठा, ही शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा प्रकार आहे."
-प्रशांत विचूरकर, शेतकरी, वायगाव (नि.)
"लोड मॅनेज होत नाही आहे. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. त्या कारणाने लोडशेडिंग करणे गरजेचे झाले आहे. मला या ऑफिसमध्ये दोन महिनेच झाले आहेत. या विषयावर वरिष्ठांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो."
-विकी बडगे, अभियंता, महा. विद्युत वितरण केंद्र, वायगाव (नि.)