व्याजाने रक्कम काढत आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थिकलश दर्शनयात्रा
By admin | Published: May 14, 2017 12:46 AM2017-05-14T00:46:10+5:302017-05-14T00:46:10+5:30
शेतकऱ्यांचे दु:ख मंत्रालयापर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील विजय जाधव यांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकऱ्यांचे दु:ख मंत्रालयापर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील विजय जाधव यांनी त्यांचे शेत गहाण करून व्याजाने पैसे घेत दुचाकीवरून आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थिकलश दर्शनयात्रा सुरू केली आहे. शेतकरी समस्या, तसेच कर्जमुक्तीकरिता ‘कोडोली ते मुंबई’, अशी असलेली त्यांची यात्रा शनिवारी वर्धेत पोहोचली.
विजय जाधव यांच्याकडे दहा गुंठे कोरडवाहू शेती आहे. त्यांची पत्नी रोजमजुरी करते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणेच दु:ख आहे. कधी त्यांच्याही मनात आत्महत्येचा विचार आला. यातून राज्यभर फिरून शक्य होईल तितक्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देत त्यांच्या अस्थि गोळा करून त्या मंत्रालयात नेण्याचे त्यांचे हे आंदोलन आहे. याकरिता त्यांचा दुचाकीने प्रवास सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे, हे सरकारला सांगण्यासाठी ते दुचाकीने कोल्हापूर ते मुंबई व्हाया नागपूर, असे निघाले आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगला या ठिकाणी ते शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन जाणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील शेतकरी स्व. विलास शितापे, महादेव खोत, सांगली जिल्हा भैरू कोडलकर, चंदुबाई कोडलकर जिल्हा लातूर, वडिलांना कर्ज मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेली मुलगी स्व. शीतल वायाळ व इतर अनेक जिल्ह्यांत अनेक शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकरी अस्थी रक्षा दर्शन यात्रा सुरू केली आहे. इतर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी गोळा करीत ते आज वर्धेत पोहोचले.
तत्पूर्वी, यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण ता. महागाव येथे पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या स्व. साहेबराव करपे यांच्या अस्थी कलशात घेणार आहेत. झाडगाव राळेगाव येथील आत्महत्या केलेल्या स्व. सदाशिव भोयर यांच्या अस्थी त्यांनी घेतल्या आहेत. यात वर्धेतील काही शेतकऱ्यांच्या घरी त्यांनी आज भेट देत त्यांच्या अस्थी घेतल्या. जेथे अस्थी मिळाल्या नाही, तेथील स्मशानभूमीची माती त्यांनी घेतली आहे. आत्महत्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन मुख्यमंत्र्यांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत.
कोडोली ते मुंबई दुचाकी यात्रा : मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार
कोडोली ते मुंबई दुचाकी यात्रा : मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार