चाऱ्याअभावी गोधन काढले विकायला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:00 AM2018-03-28T00:00:25+5:302018-03-28T00:00:25+5:30
आता ग्रामीण भागातही गुरे चारण्याकरिता गुराखी मिळत नाही. परिणामी, गोपालक तथा शेतकरी हतबल झाले आहेत.
ऑनलाईन लोकमत
चिकणी (जामणी) : आता ग्रामीण भागातही गुरे चारण्याकरिता गुराखी मिळत नाही. परिणामी, गोपालक तथा शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी गायी, म्हशी, बकºया आदी गोधन विक्रीस काढल्याचे दिसून येत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून जनावरे पाळली जातात. दुग्ध व्यवसाय उत्तम धंदा आहे. शेतकºयांचे शेती, दूध असे समीकरण समजले जात होते; पण कालांतराने जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पडिक जमिनी कमी झाल्यामुळे गुरे चारायची कुठे, असा प्रश्न गुराख्यांसमोर निर्माण झाला आहे. शिवाय शहरांसह ग्रामीण भागातील चराई क्षेत्रसुद्धा कमालीचे घटले आहे. यामुळे गुरे चारण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाळीव गुरांपासून शेतीला उपयुक्त ठरणारे शेणखत मिळते. दूध, शेणखतामुळे उत्पन्न अधिक होत होते. यासाठी गायी, म्हशी तसेच बकऱ्या आदी गुरे पाळली जात होती; पण सध्या महागाईच्या काळात गायी, म्हशी व बकऱ्यांची रखवाली देणे न परवडणारी बाब ठरत आहे. गाय, बकरीसाठी मासिक २०० रुपये तर म्हशींसाठी २५० रूपये द्यावे लागतात. एवढी रक्कम देऊनही गुराखी मिळत नसल्याची खंत शेतकरी, गोपालकांकडून व्यक्त केली जाते. जामणी येथे गुरे चारण्याकरिता पुलगाव दारूगोळा भांडाराची पडिक जमीन होती; पण यावर्षी नव्यानेच सदर पडिक जमिनीला कुंपण घालण्यात आले आहे. यामुळे गुरे चारण्याकरिता पडिक शेतजमीनच राहिलेली नाही. यामुळे जामणी येथील गोपालक तथा शेतकरी गुरे विकत असल्याचे दिसून येत आहे.
चाराही महाग
गुरांसाठी चाऱ्याची व्यवस्था करतानाही आता शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. शेतातील कुटार खाण्यायोग्य राहिले नाही. यामुळेही गुरे पाळणे कमी होत आहे.