दारूविक्री; पती-पत्नीला तीन वर्षे सश्रम कारावास २५ हजारांचा दंड
By admin | Published: May 27, 2017 12:36 AM2017-05-27T00:36:07+5:302017-05-27T00:36:07+5:30
दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या तिगाव येथील पाटील दाम्पत्याला दोन कलमान्वये तीन वर्षे सश्रम कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैधरित्या दारूविक्री करणाऱ्या तिगाव येथील पाटील दाम्पत्याला दोन कलमान्वये तीन वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठाण्यात आली. सदर निकाल प्रथम श्रेणी न्यायालयाने शुक्रवारी दिला.
शुभांगी जयंत पाटील (३२) व जयंत शंकर पाटील (३७) रा. तिगाव अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांना प्रथम श्रेणी न्यायालय क्रमांक ७ यांनी दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) मध्ये तीन वर्ष आणि कलम ८३ दारूबंदी अधिनियम अंतर्गत तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. शिवाय दोघांनाही प्रत्येकी २५ हजार रुपये दंड ठोठावला. सदर गुन्ह्याचा तपास सावंगी पोलीस ठाण्याचे रामदास बिसने यांनी केला होता. या प्रकरणात सरकारी वकील समीर डुगे यांनी बाजू मांडल्याची माहिती ठाणेदार शेगावकर यांनी दिली.
दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूच्या गुन्ह्यात दोषसिद्धी होण्याचे प्रमाण कमी असल्याने हा निकाल पोलिसांच्या कारवाईकरिता महत्त्वाचा ठरणारा असल्याच्या प्रतिक्रीया पोलीस विभागातून मिळत आहेत.