सेना-भाजपने शेती व्यवस्था उद्ध्वस्त केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 06:00 AM2019-10-11T06:00:00+5:302019-10-11T06:00:11+5:30
शरद पवार म्हणाले, विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोटी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झालेली असून औद्योगिकरणही पूर्णत: बंद पडलेल्या अवस्थेत आहे. आज बेरोजगारांच्या हाताला काम नाही, येणारी तरुणपिढी ही कामाअभावी भरकटली जाणार आहे. विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी कारभार सुरू आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम शासनाचे आहे;परंतु आज सरकार नावाची यंत्रणा ही उद्योगपतींची वेठबिगार झाली आहे, देशात जेथे भाजपचे राज्य आहे, त्याठिकाणी गुन्हेगारी वाढली आहे, स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र्र पवार यांनी गुरुवारी येथे केला. हिंगणघाट विधानसभा मतदार क्षेत्रात गोकुलधाम मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार प्रा. राजू तिमांडे, राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, माजी आमदार वसंत बोंडे, किशोर माथनकर, दिवाकर गमे, संतोषराव तिमांडे, काँग्रेसचे माधव घुसे, पंढरी कापसे, श्रावण ढगे, राजेंद्र डागा, सुरेखा ठाकरे, वर्षा निकम उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, विद्यमान केंद्र व राज्य सरकार हे शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोटी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मूठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. आज मुंबईसारख्या महानगरातील गिरणी उद्योग बंद करून त्याठिकाणी चाळीस मजली इमारती उभ्या होत आहेत. हेच षड्यंत्र हिंगणघाटसारख्या शहरातही राबविण्यात येणार आहे. हे चित्र अतिशय विदारक आहे. राज्य तुमच्या हातात दिले; परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील एकाही गावाचा रस्ता ठिक नाही. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य आहे. आज खड्डेयुक्त महाराष्ट्राची ओळख होत आहे, ही स्थिती बदलण्याची आज आहे. लोकांचे आर्थिक जीवनमान सुधारायचे आहे त्यासाठी कारखानदारी नव्याने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे, तरच तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल होईल. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; परंतु त्याविषयी कोणती उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही, केवळ आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून गुन्हे नोंदविण्याचे काम हे सरकार करीत आहे, असे ते म्हणाले.
सभेचे संचालन राजेश शेंडे यांनी केले. प्रास्ताविक शेषकुमार येरलेकर यांनी केले.