साहेबांचा निरोप समारंभ; कर्मचारी काम सोडून हॉटेलात, अभ्यागतांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2022 02:10 PM2022-08-26T14:10:06+5:302022-08-26T14:14:35+5:30
आरटीओ कार्यालयातील प्रकार, कर्मचारी म्हणाले आज काम होणार नाही
वर्धा : येथील आरटीओ कार्यालय कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. गुरुवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान कार्यालयीन वेळेत येथील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. एक-दोन कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते. त्यांना विचारणा केली असता ‘आज साहेबांचा निरोप समारंभ आहे. त्यामुळे सर्व तिकडे गेले आहे, आज तुमचे काम होणार नाही.’ असे सांगण्यात आले. या कार्यक्रमामुळे कामानिमित्त आलेल्यांना आल्या पावलीच परत जावे लागल्याने रोष व्यक्त करण्यात आला.
येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार असल्याने बऱ्याच दिवसानंतर ते वर्ध्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याकरिता एका हॉटेलमध्ये कार्यालयीन वेळेत निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला अधिकाऱ्यांच्या दालनात सत्कार समारंभ आटोपल्यानंतर सर्वच भोजनाकरिता हॉटेलात गेल्याची माहिती प्रशासकीय भवनातूनच प्राप्त झाली.
दुपारी १ वाजेपासून तर अडीच ते तीन वाजेपर्यंत या कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. बोटावर मोजण्याइतकेच काही कर्मचारी होते. तेही आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. आलेल्यांना ‘आज साहेबांना निरोप समारंभ आहे, त्यामुळे आज काम होणार नाही.’ असे सांगून परतवून लावत होते. त्यामुळे वाहन परवाना, वाहन नोंदणी यासह इतरही कामानिमित्त आलेल्यांना परत जावे लागले. निरोप समारंभ सुटीच्या दिवशी किंवा कार्यालयीन कामकाज झाल्यानंतर घेणे अपेक्षित असताना ऐन कामकाजाच्या वेळीच कार्यालय रिकामे असल्याने कामानिमित्त आलेल्यांनी रोष व्यक्त केला.
कॅश काऊंटरही होते कुलूपबंद
उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये नियमित मोठ्या प्रमाणात महसूल गोळा होत असतो. त्यामुळे कार्यालयीन वेळेत येथील कॅश काऊंटर सुरु असणे बंधनकारक आहे. परंतु या कार्यक्रमानिमित्ताने दुपारी १ वाजतापासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत येथील कॅश काऊंटर बंद ठेवण्यात आल्याचे अभ्यागतांनी सांगितले. त्यामुळे निरोप समारंभाकरिता शासनाच्या महसुलावरही परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
रित्या खुर्च्यांना पंख्याची हवा अन् लाईटचा प्रकाश
अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला निघून गेल्यानंतर दालनातील आणि कार्यालयातील पंखे आणि लाईट बंद करणे आवश्यक होते. परंतु उत्साहामध्ये पंखे आणि लाईट खाली खुर्च्यांना हवा, प्रकाश देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. या कार्यालयात मोठ्या प्रमाणात विजेची उधळपट्टी करण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याकरिता छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. कार्यालयातील कामकाज नियमित सुरु होते. फक्त भोजन अवकाशामध्ये कर्मचारी भोजनाकरिता आले होते. त्यानंतर सर्व काम सुरळीत चाललं. कार्यालयाचे कामकाज कुठेही प्रभावित झाले नाही.
-समीर शेख, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी