दोन संशयास्पद मृतदेहांमुळे खळबळ
By admin | Published: June 25, 2014 12:36 AM2014-06-25T00:36:01+5:302014-06-25T00:36:01+5:30
तालुक्यातील वडाळा (श़) व बोरगाव (टुमणी) या गावांत लागोपाठ दोन मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या विहिरीत व शेजारी बेवारस अवस्थेत आढळले़ यातील एक मृतदेह पूर्णपणे कुजला आहे़
शरीरावर घाव : दोन्ही तरुण समवयस्क
आष्टी (शहीद) : तालुक्यातील वडाळा (श़) व बोरगाव (टुमणी) या गावांत लागोपाठ दोन मृतदेह अप्पर वर्धा धरणाच्या विहिरीत व शेजारी बेवारस अवस्थेत आढळले़ यातील एक मृतदेह पूर्णपणे कुजला आहे़ यातील एक घटना सोमवारी व दुसरी मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़
सोमवारी वडाळा(श़) गावाशेजारी अप्पर वर्धा धरणाच्या बुडीत क्षेत्राच्या विहिरीत मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रमाकांत दुर्गे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला़ गावकऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. सदर मृतदेह गावातील मंगेश डाखोरे (२५) याचा असल्याचे समोर आले. मंगेश शुक्रवारपासून पासून बेपत्ता होता़ त्याच्या डोक्यावर जबर मारहाण केल्याच्या जखमा होत्या़ मंगेशला गावातीलच काही लोकांनी घरातून बोलावून नेले व यातून मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे़ पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी आकस्म्कि मृत्यूची नोंद करण्यात आली. ठाणेदार दुर्गे मंगेशच्या मृत्यूचा तपास करीत आहे़ मंगेशची आत्महत्या नसून त्याची हत्याच करण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे़ यापूर्वी त्याच्या मोठ्या भावाने विष प्राशन करून आत्महत्या केली होती़ त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, वृद्ध आईवडील आहे़
या घटनेचा तपास होतो न होतो मंगळवारी बोरगाव (टुमणी) गावाशेजारी अप्पर वर्धा धरणाच्या काठावर पाण्यात कुजलेला मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ तो मृतदेह गावातील शिवहरी भाऊराव परतेती (२६) याचा असल्याचे निष्पन्न झाले. शिवहरी चार दिवसांपासून घरून बेपत्ता होता़ त्याचा मृतदेह पूर्णपणे कुजला होता़ पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन घटनास्थळी करण्याची मागणी केली़ मात्र डॉक्टरांनी येण्याचे टाळल़े़ लागोपाठ दोन्ही दिवशी सारख्याच घटना उघडकीस आल्यामुळे खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिवहरीच्या पश्चात तीन बहिणी, आईवडील आहे. ठाणेदार दूर्गे तपास करीत आहे़ शिवहरी व मंगेशचा मृतदेह सारख्याच प्रकारात सापडल्याने सामूहिक हत्याकांड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़ याप्रकरणी पोलिसांनी अकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे़(प्रतिनिधी)