औषधी विक्रेत्याच्या मृत्यूमुळे खळबळ
By admin | Published: September 23, 2015 05:43 AM2015-09-23T05:43:06+5:302015-09-23T05:43:06+5:30
शहरातील रामनगर परिसरात औषधी विक्रेत्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री उशिरा
वर्धा : शहरातील रामनगर परिसरात औषधी विक्रेत्याचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आलेल्या या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. मनोज ऊर्फ मयूर चुन्नीलाल सहजवानी (२७) रा. नागरी बँक कॉलनी वर्धा, असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. औषधी विक्रेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने शहरातील औषधी विक्रेत्यांकडून बंद पाळण्यात आला.
रामनगर परिसरात असलेल्या जैन हॉस्पिटलसमोरील नगर पालिकेच्या व्यापारी संकुलाजवळ युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. मनोजच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या जखमा आढळून आल्या नाहीत. यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मनोजचा मृत्यू कशामुळे झाला, याचा उलगडा होऊ शकणार आहे. मृतकाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या प्रकरणी मृतकाचे वडील चुन्नीलाल सहजवानी यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास मनोजने त्याच्या आईला फोन केला होता. यात मला लवकर घ्यायला ये, असे सांगितले. यावरून कुटुंबीयांनी लगेच मनोजची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, सहजवानी कुटुंबियांना मनोज जयस्वाल व त्याचा सहकारी दुचाकीने जात असताना भेटले. त्यांनीही ‘तुमच्या मुलाला वाचवून घ्या’ असे सांगितले. यावरून आणखी शोध घेतला असता मनोज व्यापारी संकुलाच्या पायरीजवळ निपचीत पडल्याचे दिसून आले. त्याला त्वरित सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याचे नमूद करण्यात आले आहे. शहर पोलिसांत दिलेल्या या तक्रारीमध्ये मृतकाच्या वडिलांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे रामनगर परिसरात खळबळ माजली आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार बुराडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
अंगावर मारहाणीच्या जखमा नसल्याने मृत्यूचे गूढ कायम
सोमवारी रात्री मृतावस्थेत आढळलेल्या मनोजच्या अंगावर कुठल्याही प्रकारच्या मारहाणीच्या जखमा आढळून आल्या नाहीत. यामुळे मृत्यूचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांना संपूर्ण तपासही शवविच्छेदन अहवालावर अवलंबून आहे. असे असले तरी पोलीस तपासात काही बाबी समोर आल्या आहेत. त्यात घातपाताच्या शक्यतेला वाव असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
महेश मेडिकलचे संचालक
नागरी बँक कॉलनीमधील रहिवासी असलेला मनोज ऊर्फ मयूर चुन्नीलाल सहजवानी हा महेश मेडिकलचा संचालक होता. संत कंवरराम धर्मशाळेसमोर त्यांचे औषधी दुकान आहे.
चार जणांची विचारपूस
मनोज सहजवानी हा सोमवारी रात्री मित्रांसोबत बाहेर गेला होता. ज्यांच्या सोबत तो बाहेर गेला होता, त्यातील चार जणांना सोमवारी रात्रीच पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी करून सोडून देण्यात आले. औषधी विक्रेत्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने औषधी दुकानदारांनी मंगळवारी बंद पाळला.
या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण कळेल. त्यावरून पुढील कारवाई केली जाईल.
- एम.पी. बुराडे, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे, वर्धा.