कोरोनाला रोखण्यासाठी सप्टेंबर महिना महत्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:00 AM2020-08-20T05:00:00+5:302020-08-20T05:00:16+5:30
विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. फडणवीस पुढे म्हणाले, कोविड संसर्ग रेशो नियंत्रणात आहे. सध्या तो ३ टक्क्यांवर असून आयसीएमआरने ५ टक्के आयडीयल रेशो म्हटला आहे. शिवाय १० टक्क्यांपर्यंत गृहीत धरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी वर्धा जिल्ह्याची नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मी आज प्रत्यक्ष कोविड केअर सेंटरला भेट देऊन जाणून घेतली आहे. कोविड युद्धातील वर्धा जिल्ह्याचे आतापर्यंतचे काम समाधानकारक असले तरी पुढील एक महिना कोरोनाची साथ आणि मृत्यू रोखण्यासाठी पुढील महिना महत्त्वाचा असल्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट देऊन तेथील माहिती जाणली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत त्यांनी वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती जाणून घेतली. फडणवीस पुढे म्हणाले, कोविड संसर्ग रेशो नियंत्रणात आहे. सध्या तो ३ टक्क्यांवर असून आयसीएमआरने ५ टक्के आयडीयल रेशो म्हटला आहे. शिवाय १० टक्क्यांपर्यंत गृहीत धरला आहे. आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था वाढली आहे. चाचण्या वाढल्यावर रेशो कायम राहतो काय हे बघावे लागेल. दुसरे म्हणजे मोठ्या प्रमाणात ज्या वेव्हज येत आहेत, त्या जर आपण बघितल्या तर वर्धेसारख्या ठिकाणी पुढील काही दिवस महत्त्वाचे राहणार आहेत. म्हणूनच पुढील महिना महत्त्वाचा आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू दु:खद असून वर्धा जिल्ह्यात फारकाही मृत्यू झालेले नाहीत. मात्र, त्यालाही कसे नियंत्रणात ठेवता येईल याविषयी प्रभावी काम झाले पाहिजे. सेवाग्राम आणि सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालय कोविड काळात उपयुक्त ठरत असले तरी भविष्याचे नियोजन केले पाहिजे, असे याप्रसंगी त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. वर्धा जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी झालेल्या कामांची माहिती जाणून घेतल्यावर फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाविषयी समाधान व्यक्त केले.
सेवाग्रामच्या कस्तुरबा रूग्णालयाचे काम उत्तम
सेवाग्राम : विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथील कस्तुरबा रुग्णालयाच्या कोविड केअर युनिटला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. संपूर्ण माहिती जाणून घेतल्यावर त्यांनी कस्तुरबा रुग्णालयाच्या कामाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खा. रामदास तडस, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, वर्धेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, जि.प. आरोग्य सभापती मृणाल माटे, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे मँनेजिंग ट्रस्टी परमानंद तापडिया, डॉ. बी. एस. गर्ग, डॉ. नितीन गगणे, डॉ. एस. पी. कलंत्री, गिरीश देव, उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेवाग्रामचे ठाणेदार कांचन पांडे आदींची उपस्थिती होती. फडणवीस यांनी ३० मिनिट थांबून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
सावंगीत कोविड बाधिताशी साधला संवाद
माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे कोविड केअर युनिटला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांनी व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून उपचार घेत असलेल्या कोविड बाधिताशी संवाद साधला. शिवाय त्यांच्या हस्ते एका रुग्णाला डिस्चार्ज कार्ड देण्यात आले. याप्रसंगी आ. समीर मेघे, खा. रामदास तडस, माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, डॉ. अभ्यूदय मेघे, डॉ. ललीत वाघमारे, डॉ. घेवडे, डॉ. संदीप श्रीवास्तव, डॉ. चंद्रशेखर महाकाळकर आदींची उपस्थिती होती.