चुरीमुळे अपघाताची मालिका
By admin | Published: January 21, 2016 02:06 AM2016-01-21T02:06:27+5:302016-01-21T02:06:27+5:30
वर्धा - कानगाव, हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर होत आहे.
रस्त्याच्या कडेला चुरीचे ढीग : किरकोळ अपघात झाले नित्याचे
वर्धा : वर्धा - कानगाव, हिंगणघाट मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात मोठ्या प्रमाणात चुरीचा वापर होत आहे. पण याच चुरीमुळे मार्गावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. यात आतापर्यंत एकास जीवही गमवावा लागला आहे.
वर्धा- वायगाव तसेच कानगाव व हिंगणघाट हा मार्ग नेहमी वर्दळीचा आहे. या मार्गावर जिल्ह्यातील दोन मोठ्या कंपन्या, नवोदय विद्यालयासह अनेक शाळा महाविद्यालये आहेत. परिणामी हा मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. कंपन्यांमुळे अवजड वाहनेही येथे मोठ्या संख्येने धावतात. यामुळे गत काही वर्षांपासून वर्धा वायगाव वा पुढे हिंगणघाटपर्यंत जात असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली होती. परिणामी अपघाताची मालिका सुरू झाली होती. या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे यासाठी अनेक संघटनांद्वारे प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली.
निवेदनांची व प्रवाश्यांना होत असलेली गैरसोय लक्षात घेत या रस्त्याची दुरुस्ती सुरू झाली. डाबरीकरणाचे काम अद्यापही सुरू आहे. पण सदर डांबरीकरण करताना खड्डे बुजविण्यासाठी बारीच चुरीचा वापर केला जात आहे. वाहनांमुळे सदर चुरी मार्गावर इतरत्र पसरते. यामुळे वाहने घसरून या मार्गावर नव्याने अपघाताची मालिका बळावली आहे. काहीच दिवसांपूर्वी एकास या मार्गावर जीव गमवावा लागला. त्यामुळे या मार्गावर चुरीचा वापर न करता चांगल्या प्रकारे रस्त्याचे डांबरीकरण करावे तसेच रस्त्याच्या कडेला साचलेल्या चुरीची विल्हेवाट लावण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)