आठवडाभरात ४० तासांच्या वर सेवा
By admin | Published: May 12, 2016 02:25 AM2016-05-12T02:25:01+5:302016-05-12T02:25:01+5:30
यातील १४६ परिचारिका कार्यरत असून ३५ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली ही पदे सात-आठ वर्षांपासून भरण्यात आली नाहीत.
वर्धा : यातील १४६ परिचारिका कार्यरत असून ३५ पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली ही पदे सात-आठ वर्षांपासून भरण्यात आली नाहीत. जानेवारी २०१३ मध्ये शासनाने पुन्हा ५४ पदांना मंजुरी प्रदान केली आहे; पण ही पदेही अद्याप भरली गेली नाहीत. यामुळे कार्यरत परिचारिकांवर कामाचा ताण वाढत आहे. एका परिचारिकेला आठवडाभरात ४० तास सेवा द्यावी लागते; पण रिक्त पदांमुळे अधिक वेळ सेवा द्यावी लागते. शिवाय आकस्मिक काळात परिचारिकांना सेवेकरिता तत्पर राहावे लागते.
परिचारिकेला आरोग्य सेविका पदावर पदोन्नती दिली जाते; पण ही प्रक्रियाही थांबल्याचा आरोप संघटनांकडून केला जातो. रात्रपाळीतही सेवा द्यावी लागत असल्याने परिचारिका त्रस्त झाल्या आहेत. लसीकरण, साथरोग नियंत्रण यासह अन्य उपक्रमही परिचारिकांना राबवावे लागतात. या परिचारिकांच्या मदतीकरिता उर्वरित राज्यात अर्धवेळ परिचारिका तर वर्धा जिल्ह्यात ‘पार्टटाईम लेडी अटेंडन्ट’ असे पद मंजूर आहे; पण ती पदेही भरण्यात आलेली नाहीत. कंत्राटी पदे रिक्त असल्याने परिचारिकांना मदतीकरिता कुणीही राहत नसल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये प्रसूतिच्या वेळी डॉक्टर नसतात. प्रसंगी परिचारिकांना ती कामेही करावी लागतात.
१२ वर्षांची कालबद्ध पदोन्नती मिळत नसल्याने परिचारिकांना खितपत राहावे लागत असल्याचा आरोपही संघटनांकडून केला जात आहे. रिक्त असलेली पदे आणि पद भरतीवर असलेला थांबा यामुळे कार्यरत परिचारिकांना सातही दिवस २४ तास सेवा देण्याकरिता तत्पर राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या परिचारिकांना दिलासा देण्याकरिता पदभरती करणे अगत्याचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)