लघू पशु सर्वचिकित्सालयात सुविधा ‘परिपूर्ण’ असताना सेवा ‘अपूर्ण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:52 PM2018-09-14T23:52:50+5:302018-09-14T23:54:11+5:30
हिंगणघाट या शहराचा आवाका लक्षात घेऊन तेथील पशुपालकांची गैरसोय होऊ नये याकरिता लाखो रुपये खर्चुन तालुका लघू पशुसंर्वचिकित्सालयाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी सर्व सुविधाही उपलब्ध असतांना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे योग्य सुविधा पुरविल्या जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : हिंगणघाट या शहराचा आवाका लक्षात घेऊन तेथील पशुपालकांची गैरसोय होऊ नये याकरिता लाखो रुपये खर्चुन तालुका लघू पशुसंर्वचिकित्सालयाची उभारणी करण्यात आली. या ठिकाणी सर्व सुविधाही उपलब्ध असतांना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे योग्य सुविधा पुरविल्या जात नाही. त्यामुळे पशुपालकांची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे.
हिंगणघाट शहरात २००५ मध्ये तालुका लघू पशुसर्वचिकित्सालयाची स्थापना करण्यात आली. या चिकित्सालयासोबत परिसरातील सात ते आठ गावे जोडली आहे. या ठिकाणी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना मदत करण्याकरिता पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, एक लिपीक व एक परीचर अशी पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्यास्थितीत लिपीक व पशुधन पर्यवेक्षक यांची पदे रिक्त आहे. या चिकित्सालयात जनावरांवर योग्य उपचार करण्याच्या हेतूने एक्स रे युनिट, रक्त व रक्तजल या नमुन्यांची तपासणी करण्याकरिता ब्लड अॅनालायझर आदी उपकरणे आहेत. अशा सर्व सुविधा असताना येथे जनावरांवर योग्य औषोधोपचार, शस्त्रक्रिया, लसिकरण, रोगनियंत्रण होणे अपेक्षित आहे. पण, अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही. काही अधिकारी मुख्यालयी न राहता आठवड्यातून दोन ते तीन दिवसच उपस्थित राहतात. त्यातही जनवारांची शस्त्रक्रिया होत नाही. केली तरी ती व्यवस्थित केल्या जात नाही. यामुळे जनावरांचे आजार सुधारण्याऐवजी आणखीच बळावत आहे, असा आरोपही पशुपालकांकडून होत आहे.
आमदाराकडून दखल; अधिकाऱ्यांना खडसावले
पशुपालकांना होणाऱ्या अडचणीची दखल घेत आमदार समीर कुणावार यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, लघू पशुसर्वचिकित्सालयाच्या सहायक आयुक्त डॉ.जयश्री भुगांवकर, पशुधन विकास अधिकारी डॉ.मंडलीक यांची उपस्थिती होती. यावेळी पशुपालकांनी समुद्रपूर व हिंगणघाट तालुक्यात सध्या तोंडखुरी व पायखुरीच्या रोगाची लागण झाली असून यामुळे शेतीचे काम प्रभावित झाल्याचे सांगितले. त्यामुळे आमदार कुणावार यांनी अधिकाºयांना धारेवर धरत जनावरांवर योग्य उपचार करा, गरजेनुसार योग्य शस्त्रक्रिया करा, अशा सूचना दिल्या.
हिंगणघाटला लघू पशुसर्वचिकित्सालय असून सध्या जनावरांवर रोगराई वाढत असल्याने पशुसंवर्धन विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. सर्व जनावरांवर योग्य उपचार होणे अपेक्षीत असल्याने अधिकाºयांना सूचना करण्यात आल्या. तसेच या ठिकाणी आणखी एक सर्जन देण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.
- समीर कुणावार, आमदार, हिंगणघाट.