शिक्षणाधिकाऱ्याच्या बचावाकरिता शिक्षक संघटनांच्या बैठकांचे सत्र
By admin | Published: September 13, 2015 02:02 AM2015-09-13T02:02:48+5:302015-09-13T02:02:48+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरती घोटाळ्यात गुन्हा दाखल होवून निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांच्या बचावाकरिता वर्धेतील काही शिक्षक संघटना सरसावल्या आहेत.
दोन सत्रात झाली अध्यक्षाच्या घरी सभा
वर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षक भरती घोटाळ्यात गुन्हा दाखल होवून निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांच्या बचावाकरिता वर्धेतील काही शिक्षक संघटना सरसावल्या आहेत. याकरिता एका शिक्षक संघटनेच्या अध्यक्षाच्या घरी यावर रणनिती आखण्याकरिता सतत सभा होत असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषदेत सर्व शिक्षा अभियानांतर्गत झालेल्या विशेष शिक्षक भरती प्रक्रियेत मोठा घोळ झाला. हा घोळ पोलीस ठाण्यापर्यत पोहोचला असून शिक्षणाधिकारी व त्यांना सहकार्य करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शिक्षणाधिकारी यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला. तोही अटीवर आहे. यामुळे या प्रकरणातून त्यांची सुटका कशी होईल, याचा विचार होणे सुरू झाला आहे. यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या बचावाकरिता काही संघटना एकत्र आल्याची माहिती आहे. त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या बचावाकरिता काय करता येईल या संदर्भात चर्चा करण्याकरिता एका शिक्षक संघटनेच्या अध्यक्षाच्या घरी सभा झाली. या बैठकांबाबत शिक्षक संघटना कमालीची गुप्तता बाळगत आहे.(प्रतिनिधी)