सात महिन्यात १,०८९ प्रकरणांचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 10:07 PM2018-11-15T22:07:33+5:302018-11-15T22:08:48+5:30
अल्प मनुष्यबळ असतानाही प्राप्त अर्जानुसार जमिनीची मोजणी करणे, फेरफार नोंदी घेणे आदींची एकूण १ हजार २८८ प्रकरणांपैकी मागील सात महिन्याच्या कालावधीत स्थानिक तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने तब्बल १ हजार ८९ प्रकरणांचा निपटारा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : अल्प मनुष्यबळ असतानाही प्राप्त अर्जानुसार जमिनीची मोजणी करणे, फेरफार नोंदी घेणे आदींची एकूण १ हजार २८८ प्रकरणांपैकी मागील सात महिन्याच्या कालावधीत स्थानिक तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने तब्बल १ हजार ८९ प्रकरणांचा निपटारा केला आहे. अल्प मनुष्यबळ असतानाही तालुका भूमिअभिलेख कार्यालयाचे हे कार्य इतर कार्यालयांना प्रेरणा देणारेच ठरत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
प्राप्त माहितीनुसार, १ एप्रिल २०१८ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत वर्धेच्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयाकडे फेरफारीच्या नोंदी घेण्याचे ६७२ प्रकरणे प्राप्त झाले. त्यापैकी ६०२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. तर याच कालावधीत मोजणीची ६१६ प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी ४८७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. फेरफार नोंदीची प्रलंबित असलेली ७० प्रकरणे एका महिन्याच्या आतील तर मोजणीची प्रलंबित असलेली १२९ प्रकरणे तीन महिन्याच्या आतील असल्याचे सांगण्यात आले. ही संपूर्ण प्रलंबित प्रकरणे झटपट कशी निकाली काढता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
१९९ प्रकरणे प्रलंबित
स्थानिक सिव्हील लाईन भागात असलेल्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयात मोजणीची १२९ तर फेरफार नोंदीची ७० अशी एकूण १९९ प्रकरणे प्रलंबित आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ती झटपट निकाली काढण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सदर कार्यालयातील अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र मनुष्यबळाची कमतरता जाणवते.
मंजूर पाच; पण प्रत्यक्ष कार्यरत दोनच सर्व्हेअर
वर्धा तालुका भूमिअभिलेख कार्यालयात सर्व्हेअरची पाच पद मंजूर आहेत. परंतु, सध्या प्रत्यक्षात या कार्यालयात केवळ दोनच सर्व्हेअर कार्यरत आहेत.
सदर कार्यालयाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध कामासाठी कार्यालयातीलच इतर कर्मचाºयांचे सहकार्य घेतल्या जात आहे.
३३.६३ लाखांच्या महसुलाची कमाई
या कार्यालयात मोजणीची व मालकत्तेची नकल देण्याच्या प्रकरणांमध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे नागरिकांकडून पैसे घेतले जाते. १ एप्रिल २०१८ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत वर्धेच्या तालुका भूमिअभिलेख कार्यालयाने ३३ लाख ६३ हजार ७६० रुपयांच्या महसूलीची कमाई केली आहे.
सदर कार्यालयात मोठ्या प्रमाणात विविध कर्मचाऱ्यांची पद मंजूर करण्यात आल्याचे कार्यालयात असलेल्या एका फलकावरून दिसून येते. परंतु, वास्तविक पाहता स्थानिक तालुका भूमिअभिलेख कार्यालयात नाममात्र अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत हे विशेष.