मोबाईल अॅपच्या माध्यमातून ५० वर तक्रारींचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:29 PM2017-12-24T23:29:50+5:302017-12-24T23:30:05+5:30
देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून केला जात आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचयूए’ या मोबाईल अॅपच्या माध्यमातून केला जात आहे. अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या अॅपच्या माध्यमातून ५० पेक्षा अधिक तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.
‘स्वच्छता एमओएचयूए’ हे मोबाईल अॅप प्रत्येक स्मार्ट फोनच्या प्ले-स्टोअरमधून नागरिकांना ‘इन्स्टॉल’ करता येते. अॅपचे इंस्टॉलेशन होताना पडताळणीसाठी मोबाईल क्रमांकाची विचारणा केली जाते. भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविताच चार अंकी ओटीपी क्रमांक प्राप्त होतो. तो आवश्यक त्या ठिकाणी नोंदविताच मोबाईल सिस्टीमशी जुळत सदर मोबाईल धारकाचे लोकेशन ट्रेस होते. त्यानंतर इंस्टॉल झालेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून घरबसल्या नागरिकांना छायाचित्रासह अस्वच्छतेबाबत तक्रार नोंदविता येते. नागरिकांनी तक्रार केल्यानंतर काही सेकंदात त्याची माहिती आॅनलाईन पद्धतीने वर्धा नगर पालिकेतील कर्मचाºयांपर्यंत पोहोचते. त्या तक्रारींचा निपटारा दोन दिवसांत करणे क्रमप्राप्त असून सध्या वर्धा न.प. प्रशासन प्रत्येक तक्रार आठ तासांतच निकाली काढत आहे. परिणामी, वर्धा न.प. ची ही कामगिरी स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल ठरत आहे. ‘स्वच्छता एमओएचयूए’ या अॅपच्या माध्यमातून वर्धा न.प.ला दोन महिन्यांत एकूण ५८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पैकी ५१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून उर्वरित सात तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी प्रक्रियेत असल्याचे सांगण्यात आले.
अवघ्या आठ तासांत तक्रारींचा निपटारा
मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींचा निपटारा ४८ तासांत करणे क्रमप्राप्त आहे, अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत; पण स्वच्छ, सुंदर व हरित वर्धा शहराचे उद्दिष्ट उराशी बाळगणाऱ्या वर्धा नगर पालिकेच्यावतीने प्राप्त तक्रारी अवघ्या आठ तासांतच निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अभिप्राय नोंदविण्याची सुविधा
शहरातील प्रत्येक प्रभागासाठी स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक पालिकेद्वारे करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त होताच न.प.तील संगणक अभियंता अनूप अग्रवाल ती त्या प्रभागातील स्वच्छता निरीक्षकाला वळती करतात. अवघ्या आठ तासांत त्यावर कार्यवाही करीत स्वच्छता निरीक्षक झालेल्या कार्यवाहीची माहिती छायाचित्रासह अपलोड करतात. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारकर्त्याला आपला अभिप्राय देता येत असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारचा हा उपक्रम आहे. अस्वच्छतेबाबतची तक्रार या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या करता येते. शिवाय तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीबाबतही अभिप्राय नोंदविता येतो. अधिकाधिक नागरिकांनी स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी तथा न.प.च्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मोबाईल अॅप आपल्या स्मार्ट फोनमध्ये इन्स्टॉल करावा.
- अश्विनी वाघमळे, मुख्याधिकारी, न.प. वर्धा.