वातानुकूलित वाहनातून चालतो सट्टापट्टीचा जुगार
By Admin | Published: June 10, 2015 02:12 AM2015-06-10T02:12:26+5:302015-06-10T02:12:26+5:30
आजपर्यंत एखाद्या पानटपरीवर वा कुण्या दुकानाच्या आडोशाला बसून सट्टापट्टीचा व्यवसाय चालत असल्याचे पोलीस कारवाईत दिसून आले;...
एकाला अटक : पुलगाव येथील कारवाई
वर्धा : आजपर्यंत एखाद्या पानटपरीवर वा कुण्या दुकानाच्या आडोशाला बसून सट्टापट्टीचा व्यवसाय चालत असल्याचे पोलीस कारवाईत दिसून आले; पण पुलगाव येथे एका वातानुकूलीत कारमध्ये बसून हा व्यवसाय सुरू असल्याचे विशेष पथकाने केलेल्या कारवाईत समोर आले. सोमवारी रात्री पुलगावच्या रामनगर भागात केलेल्या कारवाईत कारमध्ये बसून सट्टापट्टीचा व्यवसाय करणाऱ्या विनोद ठाकरे याला अटक करण्यात आली. त्याच्याजवळून एकूण ३ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, सोमवारी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने पुलगावच्या रामनगर येथे कारवाई करीत विनोद बापुराव ठाकरे (४२) याला सट्टापट्टीचा जुगार खेळताना अटक केली. विनोद पोलिसांची नजर चुकवून त्याच्या मालकीच्या एम.एच. ३९ डी.व्ही. १९६१ या वातानुकूलित कारमध्ये बसून सट्टापट्टीचा जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.
त्याच्याकडून सट्टापट्टी साहित्य, भ्रमणध्वनी, रोख रक्कम व एक चार चाकी वाहन, असा एकूण ३ लाख ८ हजार १४५ रुपयांचा माल जप्त करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन जाधव, संजय मांते, जमादार विवेक बनसोड, विवेक धनुले, अभय खोब्रागडे, विकास मुंडे, सुशील सायरे, महेंद्र गिरी, श्रीधर उईके यांनी केली.(प्रतिनिधी)