सेवाग्राम विकास आराखड्यालाही आचारसंहितेचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 09:40 PM2019-04-12T21:40:23+5:302019-04-12T21:41:04+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ आॅक्टोबर २०१९ ला साजरी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने सेवाग्राम, पवनार विकास आराखडा तयार करून याअंतर्गत विकास कामे गांधी जयंतीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती २ आॅक्टोबर २०१९ ला साजरी होणार आहे. यासाठी राज्य सरकारने सेवाग्राम, पवनार विकास आराखडा तयार करून याअंतर्गत विकास कामे गांधी जयंतीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, ग्रामपंचायत, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिताच मे महिन्यापर्यंत राहणार आहे. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सेवाग्राम व पवनार विकास आराखड्यातील कामे रखडण्याची चिन्हे आहेत.
विद्यमान राज्य सरकारने महात्मा गांधींची कर्मभूमी सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे यांची पावनभूमी पवनारसह परिसरातील गावांच्या विकासाच्या दृष्टीने सेवाग्राम विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यातून पवनार व सेवाग्राम भागात अनेक विकास कामे केली जात आहेत. पवनारात २६ कोटी रुपये घाट विकास कार्यक्रमासाठी, ६ कोटी ९ लाख रुपये अंतर्गत विकासासाठी देण्यात येणार आहेत. याशिवाय धाम नदीवरील बंधाऱ्याच्या वरच्या भागात २ कोटी ६४ लाख रुपयांतून फॉरेस्ट पार्क तयार करण्यात येणार आहे.
विद्यमान स्थितीत धामनदीच्या भागात घाटाचे बांधकाम करण्यात आले आहे. तसेच नंदीघाट व आश्रम भागाला लागून असलेल्या भागात दर्शनी गेट व काही इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, फॉरेस्ट पार्कची निविदा काढण्यात आली असली तरी वर्क आॅर्डर अजूनही देण्यात आलेला नाही. आचारसंहिता असल्याने वर्क आॅर्डरचे काम रखडले आहे. तसेच अंतर्गत विकास कामांचाही कार्यारंभ आदेश रखडलेला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही आचारसंहितेमुळे या विकासकामांवर परिणाम झाला आहे. २ आॅक्टोबरच्या १५० व्या गांधी जयंती पूर्वी हे काम मार्गी लागणे कठीण आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थानांतरणामुळे बराच परिणाम
सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मोठा वेग दिला होता. मात्र, नवाल यांची येथून बदली झाली. नव्याने आलेल्या जिल्हाधिकाºयांनी सदर आराखड्याच्या कामाबद्दल आढावा बैठक घेतली नसल्याचे बोलले जाते. ते आराखड्याच्या कामाकडे दुर्लक्ष करून आहेत. अधिकारी बदलल्याने या आराखड्याच्या विविध कामांकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम सेवाग्राम व पवनार या दोन्ही गावाच्या विकासावर होणार आहे.