सेवाग्रामच्या युवकाने केली हातगाडीच्या माध्यमातून बेरोजगारीवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:48 PM2017-11-13T12:48:13+5:302017-11-13T12:54:30+5:30
युवकाने नोकरीच्या मागे न लागता ऊसाच्या रसाची बंडी, कणीस विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अन्य तालुक्यातही हा व्यवसाय सुरू करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
आॅनलाईन लोकमत
सेवाग्राम : रोजगारासाठी नागरिक सतत भटकंती व स्थलांतर करीत असतात. शिक्षण घेतलेले ‘व्हाईट कॉलर’ ‘जॉब’च्या प्रतीक्षेत वय व वेळ वाया घालवितात. काही शासनाच्या योजनांचा लाभ घेत चौक राखतात; पण येथील युवकाने नोकरीच्या मागे न लागता ऊसाच्या रसाची बंडी, कणीस विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. अन्य तालुक्यातही हा व्यवसाय सुरू करण्याचा मानस त्याने व्यक्त केला.
सध्या सेवाग्राम येथे ऊसाच्या रसाची बंडी सुरू करण्याचे धाडस करीत सदर युवकाने स्वयंरोजगार सुरू केला. सोबतच अन्य तालुक्यांत इतरांना रोजगार देण्याचा मानसही गौरव तिडके यानी व्यक्त केला आहे. गौरवचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले. वडील पारंपरिक पद्धतीने शेती करीत आहे. शिक्षण झाले; पण नोकरीची संधी दिसत नव्हती. जिल्ह्यात हातगाडीवरून व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांना पाहून गौरवच्या मनात कल्पना आली. त्याने मेडिकल चौकात रसवंती सुरू केली. ती उन्हाळ्यातच चालते, असे नाही तर हिवाळ्यातही रसाला मोठी मागणी असल्याचे दिसून आले. नेमकी हिच बाब हेरून त्याने दोन हातगाड्या तयार केल्या. एका गाडीवर स्वत: तर एका युवकाला तयार करून रोजगार सुरू केला.
पावसाळ्यात नागरिक आवडीने भाजलेले कणीस व भेळ खातात. कणीसचा सिजन पावसाळ्यात असल्याने रोजगाराची संधी आहे. स्वत:च्या शेतात स्वीटकॉर्न व ऊसाचे उत्पादन घेतल्यास फायदा अधिक होता. या सर्वांचा हिशेब करून या व्यवसायाकडे तो वळला. यातून रोजगाराचा प्रश्न सुटला. सोबतच तो अन्य युवकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे, हे विशेष! एका युवकाने रोजगाराच्या वाटा स्वत:च शोधून काढल्या. शेतावर पूर्णत: निर्भर न राहता पूरक व्यवसायातून विकासाची वाटू शोधून काढली.
अन्य युवकांनाही रोजगार देण्याचा मानस
प्रारंभी सेवाग्राम येथील मेडिकल चौकात रसवंती लावून स्वयंरोजगार सुरू करणाऱ्या गौरवने आता दुसरी गाडीही तयार केली आहे. या गाडीवर अन्य एका युवकाला रोजगार दिला आहे. दोन गाड्यांवर ऊसाचा रस आणि कणिस विकण्याचा रोजगार त्याने शोधला आहे. आता त्याला अन्य तालुक्यांतही हाच व्यवसाय सुरू करावयाचा आहे. यासाठी तो अन्य बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या मानसिकतेत आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन हातगाड्या तयार केल्या असून एका गाडीला २० हजार रुपयांचा खर्च आला. आणखी दहा गाड्या तयार करायच्या असून दोन तालुक्यात त्या सुरू करणार. स्वत:च्या शेतात ऊस असून शेतातील ऊस विकत घेतला आहे. पावसाळ्यात मात्र भाजलेले व उकडलेले कणिस व भेळला मोठी मागणी असते. यामुळे बाराही महिने हमखास रोजगार आहे. जगण्यासाठी इतके तर धाडस करावेच लागणार आहे.
- गौरव तिडके, सेवाग्राम.