साडेसात वर्षांत १९ बिबट अन् दोन वाघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:00 AM2020-08-05T05:00:00+5:302020-08-05T05:00:09+5:30
सेलू तालुक्यातील बोर अभयारण्यात बीटीआर टी-४ या शिवाजी नामक वाघाचे वास्तव्य होते. मात्र, मागील काही वर्षांपासून तो बेपत्ता आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार करण्यात आली असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. मध्यंतरीच्या काळात नागपूर येथील विभागीय वनाधिकारी (वन्यजीव), बोर अभयारण्य कार्यालयात बेपत्ता असलेल्या शिवाजी नामक वाघाची नोंद नसल्याचे पुढे आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात २ हजार ९६७ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ असल्याचे सांगितले जात असले तरी त्यापैकी सर्वाधिक वाघ विदर्भात आहेत. असे असले तरी मागील साडे सात वर्षांत वर्धा सारख्या छोट्या जिल्ह्यात दोन वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. या दोन वाघांपैकी एकाचा नैसर्गिक तर दुसऱ्याचा विद्युत करंट लागून मृत्यू झाला आहे. तसेच मागील साडे सात वर्षांच्या काळात १९ बिबट आणि एका तडसाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात वन्यजीव संवर्धनासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही वन्यजीव प्रेमींची आहे.
प्राप्त माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०१३ ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील मदना शिवारात वाघाचा, २५ जून २०१४ ला हिंगणी वनपरिक्षेत्रातील धामनगाव शिवारात बिबट्याचा, १८ ऑगस्ट २०१४ ला तळेगाव वनपरिक्षेत्रातील जुनोना शिवारात बिबट्याचा, २२ मार्च २०१५ ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील बोरगाव गोंडी शिवारात बिबट्याचा, २५ मे २०१५ ला तळेगाव वनपरिक्षेत्रातील वन कक्ष क्रमांक १४८ भागात बिबट्याचा, २५ नोव्हेंबर २०१५ ला समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील शेत सर्वे क्रमांक ६५/१ मध्ये बिबट्याचा, ४ जून २०१६ ला समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील चाकूर शिवारात बिबट्याचा, ६ डिसेंबर २०१६ ला तळेगाव वनपरिक्षेत्रातील माळेगाव काळी शिवारात बिबट्याचा, १४ मार्च २०१७ ला कारंजा वनपरिक्षेत्रातील धानोली शिवारात बिबट्याचा, ७ सप्टेंबर २०१९ ला तळेगाव वनपरिक्षेत्रातील वर्धमनेरी शिवारात बिबट्याचा, १४ ऑक्टोंबर २०१७ कारंजा वनपरिक्षेत्रात शेत सर्व्हे नं.७६/१ मध्ये वाघिणीचा, २० मार्च २०१८ ला समुद्रपूर वनपरिक्षेत्राचे बल्लारपूर शिवारात बिबट्याचा, १२ मे २०१८ आर्वी वनपरिक्षेत्रातील हरदोली शिवारात बिबट्याचा, १४ डिसेंबर २०१८ ला आष्टी वनपरिक्षेत्रातील बेलोरा शिवारात बिबट्याचा, १५ मार्च २०१९ ला समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील वर्धा-शेडगाव मार्गावर बिबट्याचा, ११ जुन २०१९ ला समुद्रपूर वनपिरक्षेत्रातील गोविंदपूर शिवारात तडसाचा, १६ जुन २०१९ ला वर्धा शहराशेजारील पिपरी (मेघे) येथे आठ महिण्याच्या बिबट्याचा, २१ ऑगस्ट २०१९ ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील मौजा सहेली शिवारात बिबट्याचा, १२ डिसेंबर २०१९ ला वर्धा वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारात बिबट्याचा, २२ जुन २०२० ला समुद्रपूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ३२३ मध्ये बिबट्याचा, ८ जुन २०२० ला खरांगणा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक २०७ मध्ये बिबट्याचा तर २८ जुलै २०२० ला कारंजा वनपरिक्षेत्रातील शेतसर्व्हे क्र.३८/२, ३९/२/१ मध्ये बिबट्याचा मृत्य झाल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे.
‘शिवाजी’ वाघ गवसलाच नाही
सेलू तालुक्यातील बोर अभयारण्यात बीटीआर टी-४ या शिवाजी नामक वाघाचे वास्तव्य होते. मात्र, मागील काही वर्षांपासून तो बेपत्ता आहे. त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार करण्यात आली असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत. मध्यंतरीच्या काळात नागपूर येथील विभागीय वनाधिकारी (वन्यजीव), बोर अभयारण्य कार्यालयात बेपत्ता असलेल्या शिवाजी नामक वाघाची नोंद नसल्याचे पुढे आले होते.
वन्यजीवांची घटती संख्या लक्षात घेऊन त्यांच्या सरंक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी केवळ वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर ढकलून चालणार नाही. वना लगतच्या गावातील नागरिकांनी तसेच इतर नागरिकांनी वन्यजीवांबाबत आस्था ठेवल्यास वन्यजीवांचा मृत्यू दर कमी होऊ शकतो. जिल्ह्यातील वन्यजीवांच्या मृत्यूचे आकडे बघता निश्चितच वन्यजीव संवर्धनासाठी विशेष मोहीम राबविल्या गेली पाहिजे.
- आशीष गोस्वामी, वन्यजीव प्रेमी, वर्धा.